Join us

कृषि पर्यटन व्यवसाय सुरु करताय तर हे वाचायलाच हवं

By बिभिषण बागल | Published: July 19, 2023 12:24 PM

ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या विकासासाठी फलोत्पादन, दुग्धव्यवसाय, शेळी व मेंढी पालन, कुक्कुट पालन, रेशीम उद्योग, मधुमक्षिकापालन, मत्स्यव्यवसाय इ. कृषी संलग्न विषयाचा एकत्रित विचार केल्यास, ग्रामीण भागामध्ये कृषी पर्यटनाला निश्चितपणे चालना मिळू शकते.

राज्यातील सुमारे ५५ ते ६० टक्के लोक प्रत्यक्षपणे शेतीवर अवलंबून आहेत. ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या विकासासाठी फलोत्पादन, दुग्धव्यवसाय, शेळी व मेंढी पालन, कुक्कुट पालन, रेशीम उद्योग, मधुमक्षिकापालन, मत्स्यव्यवसाय इ. कृषी संलग्न विषयाचा एकत्रित विचार केल्यास, ग्रामीण भागामध्ये कृषी पर्यटनाला निश्चितपणे चालना मिळू शकते. 

राज्यातील शेतकऱ्यांना पुरक व्यवसाय उपलब्ध करुन देणे आणि शहरी पर्यटकांना शांत, निसर्गसंपन्न ठिकाणी राहून पर्यटनाचा आनंद मिळावा यासाठी एक सुनियोजीत व्यवस्था निर्माण करुन पर्यटन विकास साध्य करण्यासाठी मा. मंत्रीमंडळाच्या दि.६/९/२०२० रोजी झालेल्या बैठकीतील निर्णयानुसार राज्यात खालीलप्रमाणे कृषि पर्यटन धोरण राबविण्यास मान्यता देण्यात आली आहे.

कृषी पर्यटनाचा उद्देश :१) कृषी पर्यटनातून ग्रामीण विकास आणि ग्रामीण विकासातून राज्याचा विकास साधणे.२) कृषी पर्यटनाच्या माध्यमातून शेती उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध करुन देणे.३) कृषी पर्यटनाला कृषी पूरक व्यवसाय म्हणून प्रोत्साहन देणे.४) ग्रामीण भागातील लोककला आणि परंपरा यांचे दर्शन घडविणे.५) ग्रामीण महिला व तरुणांना गावातच रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देणे.६) शहरी भागातील लोकांना/विद्यार्थ्यांना शेती आणि शेती पध्दती तसेच कृषी संलग्न व्यवसायांची माहिती उपलब्ध करुन देणे.७) कृषी पर्यटनाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील राहणीमान उंचावणे.८) पर्यटकांना प्रदुषणमुक्त, शांत व निसर्गाच्या सान्निध्यात राहण्याचा अनुभव देणे.९) पर्यटकांना प्रत्यक्ष शेतातील कामाचा अनुभव देणे.१०) शेतावरील कृषी मालाच्या प्राथमिक प्रक्रियेस प्रोत्साहन देणे.(११) ग्रामीण भागातील पडीक, गायरान आणि क्षारपड जमिनी उपयोगात आणणे.

कृषी पर्यटन केंद्राकरिता पात्र घटक :१) वैयक्तिक शेतकरी२) शेतकऱ्यांच्या कृषी सहकारी संस्था ३) शासन मान्यता प्राप्त कृषी विज्ञान केंद्र४) कृषी महाविद्यालये (खाजगी व शासकीय)५) कृषी विद्यापीठे६) शेतकऱ्यांनी स्थापन केलेली भागीदारी संस्था किंवा कंपनी

कृषी पर्यटनासाठी बंधनकारक बाबी :१) कृषी पर्यटन केंद्र चालविताना शेती हा प्रमुख व्यवसाय, तर पर्यटन हा पुरक व्यवसाय असावा.२) खेडेगाव : कृषी पर्यटन केंद्र हे शहराच्या (महानगरपालिका, नगरपालिका, नगरपरिषद, नगरपंचायत) हद्दीपासून किमान १ कि.मी. बाहेर आणि शक्यतो खेडेगावामध्ये असावे.३) शेती क्षेत्र : कृषी पर्यटन शेती आणि शेती संलग्न बाबींवरच आधारित असल्यामुळे कृषी पर्यटन सुरु करण्यासाठी कमीतकमी १ एकर किंवा त्यापेक्षा जास्त शेती क्षेत्र असावे. ज्या कृषी पर्यटन केंद्रात शालेय सहली आयोजित करण्यात येणार आहेत, त्या कृषी पर्यटन केंद्राचे क्षेत्र कमीत कमी ५ एकर असावे.४) सदर ठिकाणी २४ तास पाणी उपलब्ध करुन देण्याची जबाबदारी केंद्र चालकाची राहील.५) शेतकरी : पर्यटन केंद्र चालविणारी व्यक्ती ही वैयक्तिक शेतकरी असल्यास तो / ती स्वतः ती शेती कसणारा असावा, तसेच सदर शेती त्याच्या स्वत:च्या अथवा त्याच्या कुटुंबातील सदस्याच्या नावे असणे आवश्यक आहे. म्हणजे ७/१२ उतारा कुटुंबाच्या नावे असणे आवश्यक आहे.६) कृषी पर्यटन केंद्राअंतर्गत राहण्याकरीता उभारण्यात येणाऱ्या खोल्या शक्यतो पर्यावरणपुरक असाव्यात. उदा. लाकूड, बांबू. जांभा दगड, झोपडी वजा इ. बांधकाम असावे व त्यात सक्षम प्राधिकाऱ्याची परवानगी आवश्यक आहे.७) कृषी पर्यटन केंद्र चालकामार्फत भोजनाची व्यवस्था, स्वच्छ पिण्याचे पाणी, शौचालय, इ. सोयी-सुविधा पर्यटकांना उपलब्ध करुन देणे बंधनकारक राहील.८) पर्यटन धोरणात नमूद केल्याप्रमाणे इयत्ता पाचवी ते दहावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी अशा केंद्रांना किमान एक शैक्षणीक सहल/भेट आयोजीत करण्यात यावी.

टॅग्स :शेतीपर्यटनपीकशेळीपालनदुग्धव्यवसाय