Join us

अकोल्यात साकारणार राज्यातील पहिला आदर्श ॲग्री-टुरिझम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 01, 2023 2:30 PM

अकोल्याच्या डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात राज्यातील पहिला अॅग्री- टुरीझम (कृषी पर्यटन केंद्र) येत्या सहा महिन्यांत साकारला जाणार असून, येथेच या विषयावर प्रशिक्षण व पदविका अभ्यासक्रम सुरू केला जाणार आहे.

राजरत्न सिरसाट 

शहर-शेतीचे नाते जोडताना, नागरिक, शालेय विद्यार्थ्यांना शेती पिकासह जैवविविधतेसंबंधीची इत्यंभूत माहिती मिळावी, ग्रामीण युवकांना रोजगार उपलब्ध व्हावा, याकरिता अकोल्याच्या डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात राज्यातील पहिला अॅग्री- टुरीझम (कृषी पर्यटन केंद्र) येत्या सहा महिन्यांत साकारला जाणार असून, येथेच या विषयावर प्रशिक्षण व पदविका अभ्यासक्रम सुरू केला जाणार आहे.

यासाठीचा सामंजस्य करार या क्षेत्रातील एका कंपनीसोबत कृषी विद्यापीठाने केला आहे. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांनी विविध फळे, फुले, भाजीपाला, वनस्पती औषधींसह पिकांच्या नवीन जाती विकसित केल्या आहेत. नवे संशोधन, तंत्रज्ञानाचे काम येथे अविरत सुरू आहे.शास्त्रशुद्ध पाणलोट क्षेत्र व त्यावर अभ्यास येथे केला जात असून, विविध यंत्र, अवजारांचा विकास करण्यात आला आहे. ही माहिती एकाच ठिकाणी शेतकरी, नागरिक व शालेय विद्यार्थ्यांना बघायला व अभ्यास करायला मिळावी, यासह सर्वच विषयांचे जे नवे तंत्रज्ञान असेल ते अवगत करता यावे, खेळ व इतर मनोरंजनाची कार्यक्रम करता यावेत, असा या कृषी विद्यापीठाचा मानस आहे. याकरिता या क्षेत्रात काम करणाऱ्या पुण्याच्या कृषी पर्यटन विकास केंद्राशी सामंजस्य करार करण्यात आला आहे.

यासाठीचे प्राथमिक काम सुरू करण्यात आले आहे. कृषी विद्यापीठाच्या कृषी पद्धती व पर्यावरण संशोधन केंद्र आहे. येथे पाणी, मातीवर विविध संशोधन सुरू असते. या संसाधनाचा कार्यक्षम वापर करून काही मॉडेल विकसित करण्यात आले आहेत. ही माहिती शेतकऱ्यांसह सर्वांनाच उपयुक्त ठरणारी आहे. या केंद्राच्या ३१ हेक्टरवर हे (ॲग्री टुरिझम) कृषी पर्यटन केंद्र साकारले जाणार आहे. हे काम संशोधन संचालक डॉ. विलास खर्चे, कृषी पद्धती व पर्यावरण संशोधन केंद्राचे प्रमुख डॉ. राजेंद्र इसाळ व डॉ. नितीन कोंडे यांच्याकडे सोपविण्यात आले आहे.

रोजगाराच्या संधी उपलब्ध होणारग्रामीण युवकांना रोजगार मिळावा हा या पर्यटन केंद्रामागील उद्देश असून, प्रशिक्षणासाठी येथे प्रशस्त सभागृह बांधण्यात येणार आहे. येथे प्रशिक्षणासह प्रात्यक्षिकही करून दाखविले जाणार आहे.

विदर्भसह राज्यातील शेतकयांसह नागरिक, विद्यार्थ्यांना बघता यावा, शेती ज्ञान प्राप्त करता यावे, यासाठी कृषी पर्यटन केंद्र सुरु करीत आहोत.डॉ. शरद गडाख, कुलगुरू, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला. 

टॅग्स :पर्यटनशेतीशेतकरी