लिड कोठून मिळणार? मतदानानंतर भाजपा, शिंदेसेनेच्या गोटातून आकडेमोड सुरू

By विकास राऊत | Published: May 17, 2024 03:34 PM2024-05-17T15:34:00+5:302024-05-17T15:34:51+5:30

औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात भाजपाचे दोन, शिंदेसेनेचे तीन, ठाकरे गटाचा एक आमदार

After voting in the Aurangabad Lok Sabha, calculations started between BJP and Shindesena | लिड कोठून मिळणार? मतदानानंतर भाजपा, शिंदेसेनेच्या गोटातून आकडेमोड सुरू

लिड कोठून मिळणार? मतदानानंतर भाजपा, शिंदेसेनेच्या गोटातून आकडेमोड सुरू

छत्रपती संभाजीनगर : लोकसभा निवडणुकीसाठी १३ मे रोजी मतदान झाल्यानंतर १४ मेचा दिवस उमेदवारांसह भाजप व शिंदेसेनेच्या आमदारांसह पदाधिकाऱ्यांनी विश्रांतीत घालविला. १५ मे रोजी मात्र मतदारसंघातील सर्व मतदान केंद्रनिहाय मतदानाची गोळाबेरीज करण्यात महायुतीची टीम गुंतली होती. महायुती व महाविकास आघाडीसह एमआयएम, वंचित बहुजन आघाडीने यावेळच्या निवडणूक मैदानात उडी घेतली होती. 

महायुतीने मोठ्या प्रमाणात स्टारप्रचारकांची फौज आणली होती. तर महाविकास आघाडीला एकच मोठी सभा घेता आली. एमआयएम आणि वंचितच्याही सभाही मतदारसंघात झाल्या. महायुतीसाठी भाजपाने सर्वाधिक मेहनत घेतली असून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ८ मे रोजी कान टोचल्यानंतर सगळी यंत्रणा कामाला लागली होती. त्यानुसार आता मतदारसंघातील बूथनिहाय मतांची गोळाबेरीज केली जात आहे.

१३ मे रोजी ६३.०७ टक्के मतदान झाले. महायुतीकडे संदीपान भुमरे, महाविकास आघाडीकडून चंद्रकांत खैरे, एमआयएमकडून विद्यमान खा. इम्तियाज जलील यांच्यातच खरी लढत दिसते आहे.

भाजपने लावली होती यंत्रणा
१. शेवटच्या क्षणापर्यंत जागा सुटेल, असे भाजपला वाटत होते. भाजपाने १७०० बूथपर्यंत बांधणी केली होती. शिंदेसेनेला जागा सुटल्याने भाजप नाराज होता. जागा शिंदेसेनेला गेली तरी मोदींसाठी भाजपने काम केले.
२. भुमरे यांनी अर्ज भरल्यानंतर भाजपने सहकार्याची भूमिका घेतली. पूर्व आणि गंगापूर मतदारसंघात भाजपाने कामाला सुरुवात केली. गृहनिर्माणमंत्री अतुल सावे, आ. प्रशांत बंब यांनी मतदारसंघ पिंजून काढला.
३. उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या आदेशानंतर भाजपाने शेवटच्या टप्प्यात ग्रामीण व शहरी यंत्रणा, विविध समुदायांचे मेळावे, उद्योजक बैठकांसाठी परिश्रम घेतले. खा. नवनीत राणा यांचा मेळावा आयोजित केला.
४. शिंदेसेनेने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अभिनेता गोविंदा, उद्योगमंत्री उदय सामंत, मराठी अभिनेते, दिग्दर्शकांसह मंत्र्यांची फौज मतदारसंघात आणली. कमी दिवसांत जास्तीचे काम करून प्रचार यंत्रणा राबविली.

भाजपला मोदींसाठी करावे लागले काम
उमेदवार कोण आहे, यापेक्षा केंद्रांत मोदी सरकार गरजेचे आहे. हीच बाब समोर ठेवून भाजपाने काम केले. त्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीदेखील यंत्रणेला तंबी दिली हाेती. पुढील विधानसभा आणि महापालिका, जिल्हा परिषदेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर बूथनिहाय किती मतदान पडणार, याची गणित गेल्या दोन दिवसांत जुळविले आहे. त्यात काही कमी जास्त झाले तर त्याचे परिणाम पुढील निवडणुकांवर होणार, हे निश्चित.

महायुतीच्या आमदारांच्या मतदारसंघात झालेले मतदान
आ. प्रदीप जैस्वाल (शिंदेसेना) : औरंगाबाद मध्य मतदारसंघ : ६०.४० टक्के
आ. संजय शिरसाट (शिंदेसेना) : औरंगाबाद पश्चिम मतदारसंघ : ६०.५८ टक्के
आ. रमेश बोरनारे (शिंदेसेना): वैजापूर मतदारसंघ : ६४.८० टक्के
आ. अतुल सावे (भाजपा): औरंगाबाद पूर्व मतदारसंघ : ६१.११ टक्के
आ. प्रशांत बंब (भाजपा): गंगापूर मतदारसंघ : ६५.४४ टक्के
आ. उदयसिंग राजपूत (ठाकरे गट) : कन्नड मतदारसंघ : ६६.७८ टक्के

शिंदेसेनेच्या मतदारसंघात कमी मतदान
शिंदेसेनेचे आमदार असलेल्या वैजापूर वगळता औरंगाबाद मध्य आणि पश्चिम मतदारसंघात कमी मतदान झाले आहे.
भाजपाचे आमदार असलेल्या गंगापूर आणि औरंगाबाद पूर्व मतदारसंघात जास्त मतदान झाले आहे.
ठाकरे गटाचे आमदार असलेल्या कन्नडमध्ये मतदारसंघात सर्वाधिक जास्त मतदान झाले आहे.

Web Title: After voting in the Aurangabad Lok Sabha, calculations started between BJP and Shindesena

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.