उद्धव ठाकरेंना फसवणारी 'ती' बाई खरी गद्दार; ठाकरे गटाच्या उपनेत्यानं पक्ष सोडला

By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2022 05:07 PM2022-11-24T17:07:41+5:302022-11-24T17:11:45+5:30

शिवसेनेतील ४० आमदार बाहेर पडल्यानंतर पक्षाला उभारी देण्याचं काम पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडून सुरू आहे. परंतु पक्षांतर्गत वाद शिवसेना ठाकरे गटात उफाळून आला आहे. महिला पदाधिकाऱ्यांमधील वादाचा फटका पक्षाला बसताना पाहायला मिळतोय.

शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या आशा मामिडी यांनी पक्षाला जय महाराष्ट्र करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटात प्रवेश केला आहे. अलीकडेच आशा मामिडी यांना ठाकरे गटाने पक्षाचं उपनेतेपद दिले होते. त्यामुळे मामिडी यांनी पक्ष का सोडला याचं कारण त्यांनी माध्यमांसमोर स्पष्ट केले आहे.

आशा मामिडी म्हणाल्या की, माझी उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, रश्मीवहिनींबद्दल काही तक्रार नाही. मात्र स्वत: ला ज्येष्ठ नेत्या म्हणवणाऱ्या दक्षिण मुंबईतील एक महिलेला पक्षात इतर महिला नको, ३५-४० वर्ष मी काम केलंय असं त्या भाषणात म्हणतात. मग तुम्ही काय केले? असा सवाल त्यांनी केला.

ही बाई स्वत:ला उपनेता समजते, कार्यकर्त्यांना चिरीमिरी समजते. किचन माझ्या हातात आहे असं चुटकी मारून सांगतेय, किचन म्हणजे रश्मीवहिनी. त्यांच्याबद्दल ती अशी बोलते. मग तिची लायकी कळते. एखादी चांगली महिला काम करत असेल तिला काम करू दिले जात नाही. ६ वर्ष मी विनापद काम करत होते असं आशा मामिडी यांनी म्हटलं.

कामाठीपुरात मी काम करतेय. माझ्यासोबत काम करणाऱ्या पदाधिकाऱ्यांना धमकावलं होतं. असा प्रकार पक्षात सुरू असताना मी कसं काम करणार? या गद्दार आहेत. बाहेर गेलेले गद्दार नाहीत. आम्ही बाळासाहेबांच्या लेकी आहोत असंही मिमाडी यांनी सांगितले.

आता ही महिला शिंदे गटातून विधान परिषदेची आमदारकी मागतेय असंही कळालं आहे. हा कुठला प्रामाणिकपणा आहे. फक्त कुणी साड्या पाठवल्या, दागिने पाठवले, कोंबडी वडे, बिर्याणी पाठवली तेवढेच खाऊन फस्त करणारी आहे. कुठलं काम, नोकरी आली तर तिला कार्यकर्ते आठवत नाहीत मुलं आठवतात असा आरोप करण्यात आला.

हे खच्चीकरण आम्ही खपवून घेणार नाही. माझ्या चारित्र्याबाबत बोलले जाते. मी उद्धव ठाकरेंसमोर सगळं सांगितले होते. परंतु त्यांनी न्याय दिला नाही याचं वाईट वाटतं. विनायक राऊतांना त्यांनी म्हटलं होतं त्या बाईला काढून टाक तरीही पुढे काय झालं नाही असं आशा मामिडी यांनी म्हटलं.

ही बाई म्हणजे मीना कांबळी, जिला ताईही बोलायला लाज वाटते. मीना कांबळी आजची गद्दार आहे. उद्धव ठाकरेंना फसवणारी ती बाई आहे. मीना कांबळीसोबत विशाखा राऊत आहेत. या दोघी शिवसेना त्यांच्या बापाची आहे असं वागतात. आम्ही कार्यकर्त्यांनी शिवसेना बनवली आहे असा घणाघात आशा मामिडी यांनी केला.

उद्धव ठाकरेंसमोर नीलम गोऱ्हे यांनी विषय मांडला होता. त्यावेळी साहेबांनी कानउघडणी केली होती. गेली अनेक वर्ष काम करत असताना आता उपनेतेपद दिल्यावर वाद का? मीना कांबळीला पदावरून काढून टाका असं उद्धव ठाकरेंनी विनायक राऊतांना सांगितले होते. परंतु मातोश्रीवर आजही लॉबी असते ती आमच्यासारख्या महिलांना काम करू देत नाही असंही त्या म्हणाल्या.

आदित्य ठाकरे चांगले काम करतायेत. या दोघींना घरी बसवा. सगळ्यांना गुलाम म्हणून वागणूक देतात. ज्या पातळीवर हे राजकारण होतंय ते वाईट वाटते. नवीन महिलांना असं वागणूक देतात एखादी कमकुवत बाई असेल तर घरी बसेल. या दोघींना घरी बसवल्याशिवाय महिला आघाडी मोठी होणार नाही असं आशा मामिडी यांनी सांगितले.