पांढरकवडात भरदिवसा तीन घरफोड्या, रोख रक्कमेसह लाखोंचे दागिने पळविले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2022 04:00 PM2022-06-24T16:00:28+5:302022-06-24T16:02:35+5:30
अज्ञात चोरट्यांनी राशतवार, गड्डमवार व लग्न कार्य असलेल्या बोळकुंटवार या तिनही शेजाऱ्यांची घरे फोडून रोख रकमेसह लाखोंच्या सोन्याच्या दागिन्यावर डल्ला मारला.
पांढरकवडा (यवतमाळ) : लग्नकार्य निमित्त बाहेरगावी गेलेल्या तिघांची घरे फोडून अज्ञात चोरट्यांनी रोख रक्कमेसह लाखो रुपयांचे सोन्याचे दागिने चोरुन नेले. ही घटना शुक्रवारी दुपारी उघडकीस आली.
शहरातील महादेवनगर येथील रहिवासी प्रदीप राशतवार यांच्या घराशेजारी राहणाऱ्या बोळकुंटवार यांच्याकडील लग्नकार्य अदिलाबाद येथे होते. तेव्हा या वार्डातील घरची मंडळी ही सकाळीच अदिलाबाद येथे लग्नकार्यास गेली होती. हीच संधी साधत अज्ञात चोरट्यांनी राशतवार, गड्डमवार व लग्न कार्य असलेल्या बोळकुंटवार या तिनही शेजाऱ्यांची घरे फोडून रोख रकमेसह लाखोंच्या सोन्याच्या दागिन्यावर डल्ला मारला.
दुपारी २.३० वाजता प्रदीप राशतवार यांना अदिलाबाद येथे काहींनी मोबाईलवर संपर्क करुन तुमचे घर फोडल्याची माहिती दिली होती. तेव्हा राशतवार हे अदिलाबाद येथून तत्काळ परत आले. त्यांनी घरात प्रवेश केला असता, त्यांच्या घरातील सामान अस्ताव्यस्थ पडून होते. त्यांनी त्यांच्या घरातील रोख रक्कम व सोन्याच्या दागिन्यांची पाहणी केली. चोरट्यांनी त्यांच्या घरातील आलमारीमध्ये ठेवून असलेले रोख ४० हजार रूपये, तीन सोन्याची पोत, १० ग्रॅमची मुलाची माकोडा चेन, चेन, सोन्याचा टॉप, सोन्याची रिंग, सोन्याची अंगठी चोरी गेल्याचे त्यांच्या निर्दशनास आले. त्याचप्रमाणे ज्यांच्या घरी लग्नकार्य होते, त्या बोळकुंटवार यांच्या घरातील साडेसात ग्रॅमचे सोने तर गजानन गड्डमवार यांच्या घरातून तीन ग्रॅमचे सोन्याचे दागिने अज्ञात चोरट्याने लंपास केल्याचे उघडकीस आले.