यवतमाळ मेडिकलमध्ये विद्यार्थ्याची रॅगिंग; जीवघेण्या छळाची अधिष्ठाताकडे तक्रार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2022 11:29 AM2022-08-24T11:29:41+5:302022-08-24T11:29:57+5:30
वरिष्ठांकडून खासगी नोकराप्रमाणे वापर केल्याचा आरोप
यवतमाळ : येथील वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात प्रथम वर्षाला असलेल्या विद्यार्थ्याचा वरिष्ठांकडून छळ करण्यात आला. यात त्या विद्यार्थ्याला दुर्धर आजार जडला. हा धक्कादायक प्रकार कुटुंबीयांना माहीत झाल्यानंतर त्या विद्यार्थ्याच्या आईने मंगळवारी अधिष्ठाता डॉ. मिलिंद फुलपाटील यांच्याकडे रॅगिंग सुरू असल्याची तक्रार केली.
प्रथम वर्षाचा विद्यार्थी कनिष्ठ निवासी वैद्यकीय अधिकारी म्हणून कर्तव्य बजावतो. त्याला तृतीय वर्षाला असलेल्या निवासी वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून छळण्यात आले. अनमोल प्रदीप भामभानी असे या विद्यार्थ्याचे नाव आहे. वरिष्ठांकडून त्याला सलग ड्यूटीच्या नावाखाली २४ ते ४८ तास उभे ठेवले जात होते. बसण्यासाठी खुर्ची किंवा टेबल मिळत नव्हता. शिवाय वरिष्ठांचे अहवाल तयार करायला लावले जात होते. सलग उभे राहिल्यामुळे अनमोलला सेलुलायटीस हा दुर्धर आजार जडला. त्याच्या डाव्या पायात प्रचंड वेदना होऊ लागल्या. असे असतानाही डॉ. ओमकार कवितके, डॉ. अनुप शहा, डॉ. साईलक्ष्मी बानोत, डॉ. प्रियंका साळुंखे, डॉ. पी. बी. अनुषा यांच्याकडून त्रास दिला जात होता.
डॉ. ओमकार हा अनमोलला खासगी नोकराप्रमाणे वापरायचा. त्याच्या होस्टेलवर असलेल्या तिसऱ्या माळ्यावरील खोलीवर साहित्य पोहोचविणे, साफसफाई करायला लावणे अशा प्रकारचा त्रास दिला जात होता. त्यामुळे अनमोलचे दुखणे वाढत गेले. इतकेच नव्हेतर वरिष्ठांचे कॅन्टीन बिलही द्यायला जबरदस्ती केली जात होती. हा छळ सहन न झाल्याने व प्रकृती ढासळल्याने अनमोलने नागपूर येथील घर गाठले. तेथे खासगी हॉस्पिटमध्ये उपचार घेतला. त्या डॉक्टरांनी सहा आठवडे आराम करण्यास सांगितले.
अमानुषपणे वागणूक दिल्यामुळे अनमोल याच्यावर ही वेळ ओढवली आहे. कायद्याने रॅगिंग बंद असतानाही वरिष्ठांनी अनमोलचा शारीरिक व मानसिक छळ केला. या प्रकरणात संबंधितावर कायदेशीर कारवाई केली जावी, अशी मागणी करण्यात आली आहे. अनमोलची आई जुही भामभानी यांनी अधिष्ठाता डॉ. मिलिंद फुलपाटील यांच्याकडे केली आहे. या तक्रारीमुळे रॅगिंगचा प्रकार उघडकीस आला असून, खळबळ उडाली आहे.
रॅगिंगसंदर्भात विद्यार्थ्याच्या आईची तक्रार प्राप्त झाली आहे. या तक्रारीची चौकशी करण्यासाठी चार विभाग प्रमुखांची समिती गठित केली आहे. या समितीचा अहवाल येताच दोषींवर कारवाई केली जाईल.
- डॉ. मिलिंद फुलपाटील, अधिष्ठाता, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, यवतमाळ