घरकुल यादी वादाच्या भोवऱ्यात, अपात्र लाभार्थ्यांकडून यवतमाळमध्ये डीआरडीएची तोडफोड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2021 03:38 PM2021-09-28T15:38:40+5:302021-09-28T15:50:16+5:30
दोन वर्षांपूर्वी पंचायत समितीने एका एजन्सीमार्फत घरकुल सर्व्हेची गावा-गावामध्ये मोहीम राबवून गरजू लाभार्थी घरकुलापासून वंचित राहू नये, याकरिता सर्व्हे करण्यात आला. त्यानुसार यादी तयार करून प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये लावण्यात आली. मात्र त्या यादीमध्ये पक्के घर असणाऱ्यांचे पात्र व कच्चे घर असणाऱ्यांचे अपात्रमध्ये नाव आल्याने गावा-गावामध्ये असंतोष निर्माण झाला आहे.
यवतमाळ : घरकुलातील ऑनलाईन सर्वेक्षणात श्रीमंताची नावे यादीत घुसळली आणि गरिबांची नावे वगळली गेल्याचा आरोप करीत विविध गावच्या सरपंचांच्या नेतृत्वात लाभार्थ्यांनी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या कार्यालयावर मंगळवारी दुपारी मोर्चा काढला. यावेळी प्रकल्प संचालक कार्यालयात उपस्थित नसल्याने महिला मोर्चेकऱ्यांचा संताप अनावर झाला. या मोर्चेकऱ्यांनी रागाच्या भरात प्रकल्प संचालकाच्या खूर्चीवर बांगड्या फेकल्या तर जमावाने शासकीय कार्यालयातील विविध वस्तूंची तोडफोड केली.
दोन वर्षांपूर्वी पंचायत समितीने एका एजन्सीमार्फत घरकुल सर्व्हेची गावा-गावामध्ये मोहीम राबवून घराचा फोटो काढून, गरजू लाभार्थी घरकुलापासून वंचित राहू नये, याकरिता सर्व्हे करण्यात आला. त्या सर्व्हेनुसार पात्र व अपात्र ड यादी तयार करण्यात आली असून ती यादी प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये लावण्यात आली आहे. मात्र त्या यादीमध्ये पक्के घर असणाऱ्यांचे पात्र व कच्चे घर असणाऱ्यांचे अपात्रमध्ये नाव आल्याने गावा-गावामध्ये असंतोष निर्माण झाला आहे.
घरकुलातील लाभार्थी निश्चित करतांना सर्वेक्षणात पात्र लाभार्थ्यांची नावे ड फॅार्ममध्ये आली. हा सर्वे ऑनलाईन करण्यात आला. त्याचे कामकाज जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेने त्रयस्थाकडे सोपविले होते. मात्र, संबंधित यंत्रणेने सर्वेक्षणच केले नसल्याचा गावकऱ्यांचा आरोप आहे. जाहीर झालेल्या यादीत सर्वेक्षण करणाऱ्यांची पूर्ण नावे नाहीत. तसेच लाभार्थ्यांची माेजकीच नावे आल्याने अनेकजण संतापले आहेत.
त्यातूनच मंगळवारी दुपारी सरपंचांच्या नेतृत्त्वाखाली जिल्हा परिषदेतील ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प विकास कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता. मात्र, तेथे प्रकल्प संचालक उपस्थित नसल्याने संतप्त झालेल्या मोर्चेकऱ्यांनी तोडफोड केली. या मोर्चात जांभ, माळमसोला, अर्जूना , बेचखेडा, भामराजा, मनपूर, अकोला बाजार, बोथबोडन , रूई, हिवरी, मांगुळ, वाई, पिंप्री, कामठवाडा, मुरझडी येथील ग्रामस्थ सहभागी झाले होते.