पदोन्नतीसाठी एकवटले जिल्ह्यातील शिक्षक, शेकडो जागा रिक्त; झेडपीपुढे आंदोलन

By अविनाश साबापुरे | Published: January 5, 2024 07:15 PM2024-01-05T19:15:35+5:302024-01-05T19:16:27+5:30

‘टीईटी’वरून संतापाचा भडका

District teachers united for promotion, hundreds of vacancies; Movement before ZP | पदोन्नतीसाठी एकवटले जिल्ह्यातील शिक्षक, शेकडो जागा रिक्त; झेडपीपुढे आंदोलन

पदोन्नतीसाठी एकवटले जिल्ह्यातील शिक्षक, शेकडो जागा रिक्त; झेडपीपुढे आंदोलन

अविनाश साबापुरे, यवतमाळ: विषय शिक्षक म्हणून पदोन्नतीसाठी टीईटी आवश्यक असल्याच्या मुद्द्यावरून शिक्षकांच्या संतापाचा भडका उडाला आहे. जिल्ह्यात विषय शिक्षकांच्या शेकडो जागा रिक्त असल्याने टीईटीची अट शिथिल करून पदोन्नती प्रक्रिया तातडीने राबवावी, या मागणीसाठी जिल्ह्यातील सर्वच शिक्षक संघटनांनी शुक्रवारी जिल्हा परिषदेपुढे धरणे आंदोलन केले.

जिल्हा परिषद शिक्षक संघटनांचा समन्वय महासंघाच्या नेतृत्वात जिल्हाभरातील शिक्षकांनी या आंदोलनात सहभाग घेतला. विषय शिक्षक पदस्थापनेसाठी १० जून २०२३ रोजी विषयनिहाय अंतिम विकल्पासह यादी प्रसिद्ध करण्यात आली होती. परंतु, टीईटीच्या संभ्रमामुळे पदस्थापनेची प्रक्रिया स्थगित करण्यात आली. तर २५ ऑक्टोबर २०२३ च्या पत्रानुसार राज्याच्या शिक्षण विभागाने २०१३ पूर्वी नियुक्त झालेल्या शिक्षकांना वेतन्नोतीसाठी टीईटीची अट शिथिल केली आहे. त्यानुसार लातूर जिल्हा परिषदेने पदस्थापनेचे आदेशही वितरित केले आहे. ठाणे जिल्हा परिषदेनेही प्रक्रिया सुरू केली आहे. परंतु, वारंवार निवेदने देऊनही यवतमाळ जिल्हा परिषदेने याबाबत कार्यवाही केली नाही. त्यामुळे शिक्षकांनी शुक्रवारी धरणे आंदोलन केले. तातडीने विषय शिक्षक वेतन्नोतीची समुपदेशनाची तारीख निश्चित करण्याची मागणी यावेळी निवेदनातून करण्यात आली. मागणी मान्य न झाल्यास १५ ते २० जानेवारीपर्यंत साखळी उपोषण, त्यानंतर बेमुदत उपोषण करण्याचा इशारा देण्यात आला.

यावेळी झालेल्या सभेत मधुकर काठोळे, राजूदास जाधव, ज्ञानेश्वर नाकाडे, रमाकांत मोहरकर, किरण मानकर, नंदकिशोर वानखेडे, डाॅ. सतपाल सोवळे, राजेश उदार, आसाराम चव्हाण, पुंडलिक रेकलवार, शरद घारोड, शशिकांत लोळगे, महेंद्र वेरुळकर, नदिम पटेल, कुलदीप डंभारे, तुषार आत्राम, जगदीश ठाकरे, शेरू सय्यद, शशिकांत चापेकर, सुनिता गुघाणे, किरण राठोड, गजानन पवार, ए. सी. चौधरी, मो. रफिक, डाॅ. संदीप तंबाखे आदींनी मनोगत व्यक्त केले. या सभेचे सूत्रसंचालन सचिन तंबाखे यांनी केले. तर आभार पुरुषोत्तम ठोकळ यांनी मानले. स्वप्नील फुलमाळी, राजेश जुनघरे, महेंद्र पाटील, राजहंस मेंढे, खंडाळकर, गोविंद जाधव, खडके, आनंद शेंडे, संतोष मरगडे यांच्यासह संपूर्ण शिक्षक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती. 

वरिष्ठांच्या मार्गदर्शनाची प्रतीक्षा : शिक्षणाधिकारी

शिक्षकांच्या आंदोलनादरम्यान शिक्षणाधिकारी किशोर पागोरे, उपशिक्षणाधिकारी नीता गावंडे यांनी भेट देऊन आंदोलकांशी चर्चा केली. विषय शिक्षकांची पदस्थापना लवकरच करण्यात येईल. प्रशासनाची पूर्ण तयारी आहे. याबाबत वरिष्ठांकडे मार्गदर्शन मागितले असून मार्गदर्शन मिळताच प्रक्रिया करण्यात येईल, असे आश्वासन शिक्षणाधिकाऱ्यांनी दिले.

Web Title: District teachers united for promotion, hundreds of vacancies; Movement before ZP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.