यवतमाळमध्ये रात्री घडला हत्येचा थरार; भोयर बायपासवर एकाचा दगडाने ठेचून खून
By सुरेंद्र राऊत | Published: August 31, 2022 02:30 PM2022-08-31T14:30:42+5:302022-08-31T14:34:56+5:30
मृतदेहाची ओळख पटविण्याचे प्रयत्न
यवतमाळ : शहरालगतच्या भोयर बायपासवर एका इसमाची दगडाने ठेचून खून करण्यात आला. ही घटना बुधवारी सकाळी ८.३० वाजता उघडकीस आली. परिसरात फिरणाऱ्या गुराख्यांना हा मृतदेह दिसला. त्यानंतर याची माहिती अवधूतवाडी पोलिसांना मिळाली. घटनास्थळी जावून पाहणी केली असता ४६ वर्षीय अज्ञात इसमाचा दगडाने ठेचून खून झाला असावा असे दृश्य आढळून आले. या प्रकरणी पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
आर्णी व दारव्हा रोडला जोडणाऱ्या बायपासवर भोयर गावाजवळ अज्ञात व्यक्तीचा मृतदेह पडून असल्याची माहिती मिळाली. घटनास्थळावर पोलिसांनी पाहणी केली असता हा प्रकार हत्येचा असल्याचे निष्पन्न झाले. मृताची ओळख नसल्याने खुनाचे कारणही गुलदस्त्यात आहे. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला व शवचिकित्सेसाठी शासकीय रुग्णालयात पाठविला.
घटनास्थळाला अवधूतवाडी ठाणेदार मनोज केदारे, उपविभागीय पोलीस अधिकारी संपतराव भोसले, स्थानिक गुन्हे शाखेचे प्रमुख प्रदीप परदेशी यांनी भेट दिली. त्यानंतर घटनास्थळावर श्वान पथकाला पाचारण करण्यात आले. मात्र श्वान जागेवरच घुटमळले. हत्या झालेली व्यक्ती एका हाताने दिव्यांग आहे. सहकाऱ्यांनीच वादात दगडाने ठेचून खून केला असावा असा प्राथमिक अंदाज वर्तविला जात आहे.