बहुसंख्य ग्राहकांचा वीजपुरवठा पूर्ववत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2021 03:33 PM2021-05-24T15:33:31+5:302021-05-24T15:34:32+5:30
तौक्ते चक्रीवादळाने वसई मंडळात महावितरणचे ३ कोटी ७२ लाखांचे नुकसान
लोकमत न्यूज नेटवर्क
नालासोपारा : तौक्ते चक्रीवादळामुळे महावितरणच्या वसई मंडळात वीज वितरण यंत्रणेचे जवळपास ३ कोटी ७२ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. वादळामुळे वीजपुरवठा खंडित झालेल्या २ लाख ४१ हजार ग्राहकांपैकी १२०० वगळता सर्व ग्राहकांचा वीजपुरवठा पूर्ववत करण्यात आला आहे.
महावितरणचे अभियंते, कर्मचारी आणि कंत्राटदारांच्या कामगारांनी बिकट परिस्थितीत अहोरात्र काम करून ही कामगिरी केली आहे. महावितरणच्या वसई मंडळात वसई व वाडा तालुका, वसई-विरार महापालिका, नालासोपारा आदी भागातील ९ लाख ७० हजार वीज ग्राहक आहेत. १७ मे रोजी आलेल्या तौक्ते चक्रीवादळाने उच्चदाब वाहिनीचे २१०, लघुदाब वाहिनीचे ६४२ विजेचे खांब पडले किंवा वाकले.
तर ३८ रोहित्र व ४७ मिनी पिलर नादुरुस्त झाले. उच्चदाब व लघुदाब वीजवाहिन्या तुटून पडल्या. यातून महावितरणच्या वीज वितरण यंत्रणेचे ३ कोटी ७२ लाखांचे नुकसान होऊन २ लाख ४१ हजार ग्राहकांचा वीजपुरवठा बाधित झाला.
चक्रीवादळाचा प्रभाव ओसरण्यापूर्वीच दुरुस्तीच्या कामाला सुरुवात करण्यात आली, मात्र सोसाट्याचा वारा आणि पावसामुळे दुरुस्तीच्या कामांवर मर्यादा आल्या. विपरीत परिस्थितीतही अविरत दुरुस्तीचे काम करत महावितरणचे अभियंते, कर्मचारी, कंत्राटदाराचे कामगार यांनी शक्य त्या मार्गाने ग्राहकांचा वीजपुरवठा सुरळीत केला. यात ३१ कोविड रुग्णालये, दोन ऑक्सिजन प्रकल्पांचा वीजपुरवठा प्राधान्याने सुरू करण्यात आला. रविवारी दुपारपर्यंत १२०० ग्राहक वगळता सर्व ग्राहकांचा वीजपुरवठा पूर्ववत करण्यात आला आहे. कल्याण परिमंडलाचे मुख्य अभियंता दिनेश अग्रवाल वादळानंतर वसईत तळ ठोकून होते.