वाढवण बंदरावरून सेनेच्या कोंडीचे प्रयत्न

By ऑनलाइन लोकमत | Published: October 13, 2019 11:27 PM2019-10-13T23:27:07+5:302019-10-13T23:29:18+5:30

मुद्दा प्रचाराच्या केंद्रस्थानी : पक्षाने ठोस भूमिका जाहीर करण्याची मागणी

shivsena in trouble for vadhvan port | वाढवण बंदरावरून सेनेच्या कोंडीचे प्रयत्न

वाढवण बंदरावरून सेनेच्या कोंडीचे प्रयत्न

googlenewsNext

पालघर : युतीत शिवसेना लढत असलेल्या पालघरबोईसर मतदारसंघात वाढवण बंदरावरून त्या पक्षाच्या कोंडीचे प्रयत्न विरोधकांनी सुरू केले आहेत. आधीच मच्छीमारीच्या हद्दीचा वाद, सागरी प्रदूषण यामुळे त्रस्त शेतकरी, मच्छीमारांनी या प्रश्नावर पक्षाने ठोस भूमिका जाहीर करत आश्वासन देण्याची मागणी केली आहे.


वाढवण बंदराबाबत शिवसेनेने ‘आम्ही लोकांसोबत राहू’ असे आश्वासन दिले आहे. मात्र नाणार येथील तेलशुध्दिकरण प्रकल्पाबाबत त्या पक्षाच्या बदलणाऱ्या भूमिकेवर बोट ठेवत नुसते आश्वासन नको, ठोस भूमिका हवी, असा मुद्दा वाढवणवासीयांनी लावून धरला आहे. त्यामुळे सध्या तोच प्रचाराच्या केंद्रस्थानी येतो आहे.


लोकसभा निवडणुकीवेळी जिंदाल जेट्टी आणि वाढवण बंदराविरोधात निवेदन देण्यासाठी आलेल्या ग्रामस्थांना ‘आम्ही लोकसभा निकाल लागल्यावर प्रत्यक्षात भेट देऊ,’ असे शिवसेनेच्या नेत्यांनी दिले होते. त्यावर भूमिका जाहीर होण्यापूर्वी पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील ठरवलेल्या डहाणूतील प्राधिकरण हटवण्याचा निर्णय केंद्रातून झाल्याने स्थानिकांनी, बागायतदारांनी तीव्र रोष व्यक्त केला. बहिष्काराचा पवित्रा घेण्याचा इशारा देण्यात आला. केळवे पूर्व भागातील सुमारे दीड ते दोन हजार स्थानिकांनी रस्ते, रेल्वे, पूल आदी मागण्यांची पूर्तता होत नसल्याने ‘नो डेव्हलपमेंट, नो व्होट’ असे बहिष्कार अस्त्र उगारले आहे.


पालघरमध्ये रस्ता रूंदीकरणाच्या नावावर २४१ वृक्षांची कत्तल करण्याचा विषयही असाच चर्चेत आहे. पंतप्रधान आवास योजनेसाठी बोईसर भागातील सुमारे १५ हजार लाभार्थ्यांनी नोंदणी केली. बँका-खासगी वित्तसंस्थांकडे नोंदणी झाली. नॅशनल हाऊसिंग बँक (एनएचबी), हुडको यांनी कायदेशीर प्रक्रि या पूर्ण करून हे प्रस्ताव संबंधित बँकांकडे पाठविले. त्यामुळे बँकांनी लाभार्थ्यांना दोन लाख ६० हजारांचे अनुदान वजा करून उर्वरित रकमेवर अल्प व्याजदर लावला होता. तीन वर्षांनंतर बँकांनी लाभार्थ्यांना पत्रे पाठवून अनुदानाची रक्कम कर्जात रूपांतरित होत असल्याचे कळविल्याने फसवणूक झाल्याची लाभार्थींची भावना आहे.

भाजप रूसुनी आहे... युतीतील बेबनाव स्पष्टपणे उघडबोईसर विधानसभेची जागा युतीत शिवसेनेला दिल्यानंतरही भाजपच्या उपजिल्हाध्यक्षांनी बंडखोरी करून उमेदवारी अर्ज भरला आहे. विक्र मगड विधानसभेत भाजपच्या तीन बंडखोरांना मुख्यमंत्री व पालकमंत्र्यांनी उमेदवारी अर्ज मागे घेण्यास भाग पाडल, पण बोईसरमध्ये भाजपचे बंडखोर उमेदवार संतोष जनाठे यांना अर्ज मागे घेण्यास सांगण्यात पक्षाला अपयश आले. या बंडखोर उमेदवाराला भाजपसह परिवाराच्या पदाधिकाऱ्यांकडून खुलेआम समर्थन मिळत आहे. त्यामुळे युतीतील बेबनाव स्पष्टपणे समोर आला आहे. पालघर विधानसभा मतदारसंघातही भाजपच्या पदाधिकाºयांचा शिवसेनेच्या प्रचारात अल्प प्रतिसाद मिळत असल्याने ‘कुछ तो गडबड है’ अशी चर्चा शिवसेनेत सुरू आहे.

Web Title: shivsena in trouble for vadhvan port

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.