Maharashtra Election 2019 : उद्धव ठाकरेंची सगळी आश्वासने हवेतच विरली

By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2019 05:27 AM2019-10-12T05:27:41+5:302019-10-12T05:28:29+5:30

- हितेन नाईक पालघर : पालघर लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मच्छीमारांना दिलेल्या आश्वासनापैकी एकही आश्वासन ...

Maharashtra Election 2019: All promises of Uddhav Thackeray vanished | Maharashtra Election 2019 : उद्धव ठाकरेंची सगळी आश्वासने हवेतच विरली

Maharashtra Election 2019 : उद्धव ठाकरेंची सगळी आश्वासने हवेतच विरली

Next

- हितेन नाईक

पालघर : पालघर लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मच्छीमारांना दिलेल्या आश्वासनापैकी एकही आश्वासन पूर्ण झाले नसून उलट त्यांच्या डोक्यावर कर्जाचे डोंगर वाढत जाऊ लागल्याने मच्छीमार मतदारांचा अपेक्षाभंग होऊ लागला आहे. त्याचे उलटे परिणाम या विधानसभा निवडणुकीत दिसून येत सेनेचा टक्का घसरण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
पालघर विधानसभेत शिवसेना उमेदवारांच्या पारड्यात हजारो मतांचे दान टाकून शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळख निर्माण करून देण्यात डहाणू ते केळवे दरम्यानच्या धाकटी डहाणू, गुंगवाडा, वरोर, चिंचणी, घिवली, काम्बोडे, तारापूर, नवापूर, उच्छेळी, दांडी, आलेवाडी, खारेकुरण, मुरबे, सातपाटी, शिरगाव, वडराई, माहीम, केळवे आदी किनारपट्टी भागातील मच्छीमार समाजाचा मोठा वाटा राहिला आहे. अनेक वर्षांपासून शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या या भागाकडे सेनेच्या वरिष्ठांनी केलेल्या दुर्लक्षामुळे या सेनेच्या बालेकिल्ल्याला भाजपने भगदाडे पाडायला सुरुवात केली. लोकसभा पोटनिवडणुकीत भाजप आणि शिवसेना स्वतंत्र लढले असताना शिवसेनेला १६ हजार २४३ मते तर भाजपच्या उमेदवाराला २० हजार ३४३ मते पडली होती. शिवसेनेपेक्षा भाजपने ४ हजार १०० मते जास्त घेत सेनेवर वर्चस्व मिळविले.
नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीपूर्वी पालघरमध्ये आलेल्या शिवसेनापक्षप्रमुख उद्धव ठाकरे, मंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांची मच्छीमार पदाधिकाऱ्यांनी पालघरच्या ठाणे जिल्हा मच्छीमार संघाच्या कार्यालयात भेट घेऊन डिझेल परताव्याची कोट्यवधी रुपयांची वर्षभरापासून थकीत असलेली रक्कम मिळावी, मच्छीमारांच्या राहत्या घरांच्या जमिनीचे सातबारे मिळावेत, मच्छी विक्र ेत्या महिलांना मच्छीमार्केटची व्यवस्था करून द्यावी, समुद्रात वाढत चाललेल्या अतिक्रमणावर निर्बंध घालावेत, पर्ससीन मासेमारीवर कायमस्वरूपी बंदी घालावी, एनसीडीसीचे अतिरिक्त व्याज माफ करावे, ओएनजीसी सर्वेक्षण नुकसान भरपाई मिळणे आदी प्रलंबित प्रश्नावर उपाय योजना आखून प्रश्न निकाली काढण्याची मागणी केली होती. तीवर सकारात्मक विचार करून डिझेल परताव्याची रक्कम देणे, जमिनींना सातबारा देणे आणि पालघरमधील मासे विक्र ेत्या महिलांना मार्केटसाठी जागा उपलब्ध करून देणे, ओएनजीसी भरपाई मिळवून द्यावी या बाबीवर तत्काळ कार्यवाही करू, असे आश्वासन देऊन तुमच्या मागण्यांना न्याय दिल्याशिवाय मी अजिबात स्वस्थ बसणार नाही, असा विश्वास दिला होता. मात्र, लोकसभा निवडणूक होऊन ६ महिन्याचा कालावधी लोटला असून एकही आश्वासनाची पूर्तता अजून झालेली नाही. त्यामुळे ही आश्वासने हवेतच विरली असून सातपाटीमधील दोन्ही सहकारी संस्थांचा वर्षभरापासूनच्या डिझेल परताव्याची थकीत रक्कम दीड ते दोन कोटीच्या घरात पोचल्याने त्या संस्था आर्थिक अडचणीत सापडल्या आहेत.
ओएनजीसी भरपाई, जमिनींना सातबारा देणे आदीबाबत चकार शब्द काढला जात नाही, तर पालघरमधील मासे विक्र ेत्या महिलांना मनोरच्या रस्त्यावरून उचलून पूर्वेकडील निर्जन भागात नेऊन बसविण्याच्या हालचाली सेनेची सत्ता असलेल्या नगरपरिषदेकडून सुरू झाल्या आहेत.

शिवसेनेने आम्हाला दिले काय?
शिवसेनेचे मंत्री एकनाथ शिंदे, आ.रवींद्र फाटक निवडणुकी दरम्यान येऊन मतदारांना आश्वासने देऊन सत्ता संपादन करून निघून जातात, मात्र जिल्ह्यातील आरोग्य, रोजगार, पाणी, विद्युत पुरवठा, भ्रष्टाचार आदीबाबत निर्माण झालेल्या समस्याचे निराकरण करण्यास मात्र ढुंकूनही पाहत नसल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे शिवसेने कडून मच्छीमारांची व अन्य मतदारांची फसवणूक होत असल्याचे वास्तव मतदारांना आता समजू लागले असून विरोधी पक्षानेही सेनेच्या पोकळ आश्वासनाचा भंडाफोड करण्यास आपल्या प्रचारात सुरुवात केली आहे. त्यामुळे इतकी वर्षे सेनेचा बालेकिल्ला म्हणून नावलौकिक मिळवून देत त्यांच्या पदरात भरघोस मतदान टाकणाºया शिवसेनेने आम्हाला दिले काय? असा प्रश्न आता किनारपट्टीवरील मतदार विचारू लागला आहे.

भाजप-सेना सरकारने मच्छीमाराना पोकळ आश्वासने देण्यापलीकडे काहीही दिलेले नाही. आमचे प्रश्न आजही जैसे थे आहेत. - संदीप म्हात्रे, राष्ट्रवादी युवक अध्यक्ष

आम्ही अनेक वर्षांपासून सेनेचे उमेदवाराला निवडून देत आहोत. मात्र आमचा भ्रमनिरास होत आहे. - दीपेश तामोरे, मच्छिमार, घिवली.

Web Title: Maharashtra Election 2019: All promises of Uddhav Thackeray vanished

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.