मी ईडी, सीबीआयला घाबरत नाही, पालघरमधून बविआचा उमेदवार देणार, हितेंद्र ठाकूर यांनी केलं स्पष्ट
By ऑनलाइन लोकमत | Published: April 5, 2024 01:22 PM2024-04-05T13:22:24+5:302024-04-05T13:22:53+5:30
Maharashtra Lok Sabha Election 2024: माझ्यावर कोणताही राजकीय दबाव नाही. कर नाही तर डर कशाला? मी ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्स यांना घाबरत नाही. आगामी लोकसभा निवडणुकीत पालघर मतदारसंघात बहुजन विकास आघाडीकडून उमेदवार उभा केला जाणार असल्याचे बविआचे सर्वेसर्वा आमदार हितेंद्र ठाकूर यांनी ‘लोकमत’ला सांगितले.
नालासोपारा - माझ्यावर कोणताही राजकीय दबाव नाही. कर नाही तर डर कशाला? मी ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्स यांना घाबरत नाही. आगामी लोकसभा निवडणुकीत पालघर मतदारसंघात बहुजन विकास आघाडीकडून उमेदवार उभा केला जाणार असल्याचे बविआचे सर्वेसर्वा आमदार हितेंद्र ठाकूर यांनी ‘लोकमत’ला सांगितले.
लोकसभा निवडणुकीत उमेदवार उभा करण्याबाबत पदाधिकारी, कार्यकर्ते यांचा आग्रह असून, त्यानुसार बैठका, मेळावे सुरू आहेत. जर बविआने उमेदवार उभा केला तर १०० टक्के निवडून येणार, असा दावाही त्यांनी यावेळी केला. पालघर जिल्ह्यातील सहा आमदारांपैकी तीन आमदार बविआचे आहेत. जिल्हा परिषदेत तीन सभापती, वसई-विरार महापालिका, अनेक ग्रामपंचायतींत सर्वांत मोठा पक्ष बविआ असून, पालघर लोकसभा मतदारसंघावर बविआचा हक्क असल्याचेही ठाकूर यांनी सांगितले.
आम्ही लोकसभा निवडणूक लढविण्याबाबत गंभीरपणे विचार करीत आहोत. आमची फिक्स मते आहेत. आमच्या पक्षाच्या उमेदवाराचे फक्त नाव घोषित करायचे इतकेच बाकी असल्याचेही ठाकूर यांनी सांगितले. १२ महिने लोकांची कामे कोण करतो, कोण उपलब्ध असतो, याचा विचार लोक नक्की करतात. म्हणून लोकांची चिंता वाटत नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.