शिंदेसेनेला ठाणे दिल्याने मीरा भाईंदरमधून भाजपच्या तिघांनी दिला राजीनामा

By धीरज परब | Published: May 2, 2024 08:22 PM2024-05-02T20:22:45+5:302024-05-02T20:23:04+5:30

शिंदेसेना , भाजपा , राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांच्या महायुती मध्ये ठाण्यावर भाजपाने लक्ष केंद्रित केले होते.  

Three BJP members resigned from Meera Bhayander after giving Thane to Shinde sena | शिंदेसेनेला ठाणे दिल्याने मीरा भाईंदरमधून भाजपच्या तिघांनी दिला राजीनामा

शिंदेसेनेला ठाणे दिल्याने मीरा भाईंदरमधून भाजपच्या तिघांनी दिला राजीनामा

मीरारोड - ठाणे लोकसभा मतदारसंघ शिंदेसने कडे जाऊन नरेश म्हस्के यांची उमेदवारी जाहीर झाल्या नंतर मीरा भाईंदर मधून भाजपाच्या तिघा जणांनी भाजपातील पदाचा राजीनामा दिला आहे. ठाणे लोकसभा मतदार संघ हा शिवसेनेचा बालेकिल्ला राहिला आहे . आनंद दीघे यांनी खेचून घेतलेल्या ह्या लोकसभा मतदार संघात गेल्या ३० वर्षां पासून अपवाद वगळता शिवसेनेचा खासदार राहिला आहे . शिंदेसेना , भाजपा , राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांच्या महायुती मध्ये ठाण्यावर भाजपाने लक्ष केंद्रित केले होते.  

भाजपाचे संजीव नाईक यांनी ७ एप्रिल रोजीच्या भाईंदरच्या बालाजी नगर मधील बैठकीत बोलताना पक्षाने आपल्याला उमेदवारीच्या अनुषंगाने हिरवा कंदील दिला असून प्रचाराची सुरवात आपण करत असल्याचे म्हटले होते.  त्या नंतर शहरात भेटीगाठी करत प्रचार चालूच ठेवला होता .  नाईक यांच्या प्रचार व वक्तव्या मुळे शिंदे सेनेत चलबिचल होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्याचा  गड हा स्वतःकडे राखत ठाण्याचे माजी महापौर नरेश म्हस्के यांना ठाणे लोकसभेची उमेदवारी जाहीर केली आहे. ठाण्याची उमेदवारी मिळाल्याने शिंदेसेनेचे शिवसैनिक यांच्यातील अस्वस्थता व शंकाकुशंकांना विराम मिळाला आहे . परंतु भाजपात त्यातही विशेषतः नाईक समर्थक यांच्यात नाराजी दिसून आली आहे. 

नवी मुंबईत अनेकांनी राजीनामे दिल्या नंतर मीरा भाईंदर मधून सुद्धा भाजपाचे जिल्हा सचिव ध्रुवकिशोर पाटील , अल्पसंख्यांक सेल चे उपाध्यक्ष एजाज खतिब व युवा मोर्चाचे पदाधिकारी विशाल पाटील ह्या तिघांनी राजीनामा दिला आहे . संजीव नाईक यांना उमेदवारी दिली नाही म्हणून पाटील यांनी जाहीर नाराजी व्यक्त करत राजीनामा दिल्याचे म्हटले आहे . तर महायुतीचे उमेदवार नरेश म्हस्के यांचा प्रचार करणार कि नाही ? ह्यावर मात्र पाटील यांनी बोलणे टाळले . ध्रुवकिशोर पाटील हे पूर्वी पासून नाईक समर्थक व भाजपात गेल्या नंतर मेहता समर्थक म्हणून ओळखले जातात . तर विशाल पाटील , एजाज खतिब हे देखील भाजपातील मेहता समर्थक म्हणून ओळखले जातात . 

भाजप जिल्हाध्यक्ष किशोर शर्मा यांनी मात्र तिघांनी राजीनामा दिला होता पण त्यांची समजूत काढली असून महायुतीचे उमेदवार नरेश म्हस्के यांना शहरातील भाजपा कार्यकर्ते निवडून देऊन युती धर्म पाळतील असे म्हटले आहे . आम्हा सर्वांचे एकच लक्ष्य आहे कि , ४०० पेक्षा जास्त खासदार निवडून देऊन मोदीजींना पुन्हा पंतप्रधान करायचे आहे . त्यामुळे म्हस्के हे उमेदवार असणार व या बद्दल नाराजी नाही .

भाजपचे जिल्हा महामंत्री अनिल भोसले यांनी सांगितले कि , महायुतीच्या उमेदवाराचा विरोध म्हणजे पंतप्रधान मोदींचा विरोध असे आम्ही मानतो . देशाच्या व राज्याच्या नेतृत्वाने घेतलेल्या निर्णय विरुद्ध कट्टर भाजपाचे कार्यकर्ते जाणार नाहीत . वाहत्या गंगेत काही जण भाजपात पोट भरण्यासाठी आले असतील तर भाजपाचे कट्टर कार्यकर्ते नाहीत तर कटोरा घेऊन आलेले कार्यकर्ते आहेत अशी टीका देखील शहरातील राजीनामा नाट्यावर भोसले यांनी केली .  

 

 

Web Title: Three BJP members resigned from Meera Bhayander after giving Thane to Shinde sena

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.