काळोख किनाट, पावसाचो झिनझिनाट

By ऑनलाइन लोकमत | Published: October 13, 2019 12:28 AM2019-10-13T00:28:05+5:302019-10-13T00:28:21+5:30

उमेदवार हैराण । प्रचारावर पडले विरजण, रस्ते, मैदानांवर चिखल झाल्याने सभा घेणे अशक्य

rain in return way in October | काळोख किनाट, पावसाचो झिनझिनाट

काळोख किनाट, पावसाचो झिनझिनाट

Next

ठाणे : आॅक्टोबर महिना सुरू झाला तरी परतीच्या पावसाने काढता पाय घेतला नसल्याने ऐन निवडणुकीत उमेदवारांच्या प्रचारफेऱ्या, जाहीर सभांवर या पावसाने पाणी फिरवले आहे. दिवसा आॅक्टोबर हीटमुळे कार्यकर्ते उन्हात घामाघूम होतात, तर सायंकाळी सोसाट्याच्या वाºयासह कडकडाट, गडगडाटासह कोसळणाºया पावसामुळे प्रचारफेऱ्यांतून कार्यकर्ते गायब होतात. रस्ते किंवा मैदानात चिखल झाल्याने छोट्या सभांवर विरजण पडत आहे.


सकाळी १० ते ११ वाजता प्रचारफेºया सुरू असताना उन्हाच्या झळा बसतात. कार्यकर्ते घामाघूम होतात. साहजिकच, पिण्याच्या पाण्यापासून थंड सरबतापर्यंत अनेक गोष्टींची व्यवस्था उमेदवारांना दिवसा करावी लागते. परंतु, सायंकाळी अचानक आकाशात काळे ढग जमा होतात. गडगडाट सुरू होतो, विजा चमकू लागतात, पावसाची जोरदार सर कोसळून जाते. संध्याकाळी प्रचारफेरीकरिता जमलेल्या कार्यकर्त्यांची पावसामुळे पांगापांग होते. अनेक उमेदवारांच्या सायंकाळच्या रॅली, छोटेखानी सभा, चौक सभा, पथनाट्य आदी प्रचाराच्या नियोजनावर परतीच्या पावसाने पाणी फिरवले आहे.
यापूर्वी विधानसभा निवडणुकीकरिता कमीतकमी ४५ दिवसांचा कालावधी मिळत होता. आता जेमतेम १५ दिवसांचा प्रचार कालावधी उपलब्ध झाला आहे. त्यात दिवसा आॅक्टोबर हीट आणि सायंकाळी पावसाची रिपरिप असा दोन टोकांचा खेळ सुरू झाल्याने उमेदवार हैराण झाले आहेत. अशा व्यस्त हवामानामुळे प्रचाराला येणारे कार्यकर्ते सर्दी, खोकला, ताप यामुळे आजारी पडण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे डोकेदुखी आणखी वाढली आहे. प्रचाराच्या पहिल्या आठवड्यात पाऊस होता. त्यानंतर, पावसाने काहीशी उघडीप घेतल्याने सर्वपक्षीय उमेदवारांना दिलासा मिळाला होता. परंतु, आता प्रचाराचा शेवटचा आठवडा सुरू झाला असताना व प्रचार ऐन रंगात आला असताना पुन्हा पावसाने बिब्बा टाकला आहे.


राज्यात एकाच टप्प्यात विधानसभेच्या निवडणुका असल्याने नेत्यांची जाहीर सभांची तारांबळ उडाली आहे. त्यातून नेत्याची सभेची तारीख मिळाल्यावर जर पावसाने सभेत विघ्न आणले आणि सभा रद्द करायला लावली किंवा उशिरा सुरू झाल्याने अपेक्षित गर्दी जमली नाही, तर उमेदवारांचे ब्लडप्रेशर वाढत आहे. सायंकाळी पावसाळी ढगांमुळे अंधार दाटून आला, तर छोट्या हेलिकॉप्टरमधून ठाणे, पालघर आणि कोकणच्या पट्ट्यात प्रचार करणाºया नेत्यांना पायलटच्या दृश्यमानता (व्हीजिबिलिटी) च्या समस्येमुळे शेवटची सभा रद्द करून मुंबई गाठावी लागत आहे.


उमेदवारांच्या प्रचाराचे नियोजन आदल्या दिवशी केले जाते. त्यानुसार, सकाळी कोणत्या भागात व सायंकाळी कोणत्या भागात प्रचार करायचा, ते ठरलेले असते. सायंकाळी पाऊस झाला तर नियोजन कोलमडते. परतीचा पाऊस आपल्या राजकीय परतीचे निमित्त न ठरो, अशी प्रार्थना उमेदवार सध्या करीत आहेत.

पावसामुळे अफवांची वावटळ
शनिवारी सायंकाळी शहराच्या विविध भागांत चारही मतदारसंंघांतून शिवसेना, राष्टÑवादी काँग्रेस, काँग्रेस, मनसे आणि भाजपच्या उमेदवारांच्या रॅली आयोजित करण्यात आल्या होत्या. सायंकाळी ५ च्या सुमारास या रॅली सुरू झाल्या होत्या. मात्र, या रॅली अर्ध्यावरच सोडून अनेक उमेदवारांना प्रचार सोडावा लागला. पावसामुळे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची कल्याणमधील प्रचारसभा रद्द झाल्याचे मेसेज व्हॉट्सअ‍ॅपवर पसरले होते. मात्र, प्रत्यक्षात भिवंडीची सभा झाल्यावर ठाकरे कल्याणमध्ये सभेला हजर राहिले. काही उमेदवारांच्या प्रचारसभा अथवा प्रचारफेºया पावसामुळे रद्द झाल्याच्या अफवा पसरवल्या जात आहेत, अशी तक्रार कार्यकर्त्यांनी केली.

Web Title: rain in return way in October

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.