वाडा शहरात दुचाकी-चारचाकींना नाही अधिकृत वाहनतळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 9, 2021 12:28 AM2021-03-09T00:28:43+5:302021-03-09T00:29:08+5:30
मुख्य रस्त्यांवरील पदपथांवर वाहनांचे अतिक्रमण
लोकमत न्यूज नेटवर्क
वाडा : वाडा शहरात दुचाकी व चारचाकी वाहनांसाठी एकही अधिकृत वाहनतळ नसल्याने बाजारात साहित्य खरेदीसाठी येणाऱ्या नागरिकांना शहरातील मुख्य रस्त्यांवरील पदपथावर वाहने उभी करण्याची वेळ आली आहे. त्याचा नाहक त्रास पादचाऱ्यांना सहन करावा लागत आहे.
वाडा शहराची लोकवस्ती झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे वाहनांची संख्याही मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. तालुक्यातील विविध खेडेगावांतून मोठ्या संख्येने दुचाकी, चारचाकी वाहनधारक येत असतात. हे वाहनचालक वाहनतळाअभावी रस्त्यांच्या कडेला वाहने उभी करून बाजारात खरेदीसाठी जात असल्याने वाहतूककोंडी होत आहे. खंडेश्वरी नाका ते परळी नाका या ७०० मीटर अंतरावर नेहमीच वाहतूककोंडी होत असते. या वाहतूककोंडीचा त्रास या मार्गावरील पदपथावरून जाणाऱ्या पादचाऱ्यांना होत आहे. वाडा शहरातील मुख्य बाजारपेठेतून नाशिककडे जाणाऱ्या वाडा - देवगांव रस्ता रुंदीकरणाचे काम करण्यात आले आहे. मात्र, रुंदीकरण करण्यात आलेल्या जागेवर बाजारात सामान खरेदीसाठी येणारे दुचाकीस्वार व चारचाकी वाहनधारक आपली वाहने पदपथावरच उभी करीत असतात. त्यामुळे या मार्गावर नेहमीच वाहतूककोंडी होत असते. शहरात नगर पंचायतीच्या मालकीच्या काही जागा आहेत. या जागा ताब्यात घेऊन नगर पंचायतीने ‘पे अँड पार्कʼ या धर्तीवर वाहनतळ सुरू करावे, अशी मागणी नगर पंचायतीचे विरोधी पक्षनेते मनीष देहरकर यांनी केली आहे.
शहरातील मुख्य रस्त्यालगत असलेल्या पदपथावर वाहने उभी करणाऱ्या वाहनचालकांवर कारवाई होणे आवश्यक आहे. नगर पंचायतीने कायद्याचा बडगा दाखवावा.
- कुणाल साळवी, ग्रामस्थ, वाडा