Maharashtra Election 2019 : एकनाथ शिंदे यांच्या मतदारसंघात तिरंगी लढत
By ऑनलाइन लोकमत | Published: October 5, 2019 01:40 AM2019-10-05T01:40:24+5:302019-10-05T01:40:47+5:30
शिवसेनेचे उमेदवार तथा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी आपला उमेदवारी अर्ज भरला.
ठाणे : कोपरी-पाचपाखाडी मतदारसंघामध्ये शुक्रवारी दुपारी १२ वाजून १२ मिनिटांचा मुहूर्त साधून शिवसेनेचे उमेदवार तथा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपला उमेदवारी अर्ज भरला. काँग्रेसच्या यादीमध्ये नाव जाहीर होऊनही हिरालाल भोईर यांनी याठिकाणी माघार घेतल्याने आयत्यावेळी सकाळी १० वाजता काँग्रेसमध्ये दाखल झालेल्या संजय घाडीगावकर यांनी तर मनसेतर्फे महेश कदम यांनी आपला अर्ज दाखल केला. त्यामुळे या मतदारसंघामध्ये शिवसेना, मनसे आणि काँग्रेस अशी तिरंगी लढत होणार आहे.
शिंदे यांनी यावेळी चौथ्यांदा आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. यावेळीही आपण गेल्या वेळी पेक्षाही जास्त मताधिक्यांनी निवडून येऊ, असा विश्वास त्यांनी अर्ज भरल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना व्यक्त केला. यावेळी त्यांच्यासोबत वडील संभाजी, पत्नी लता आणि मुलगा खासदार डॉ. श्रीकांत तसेच ठाण्याचे खासदार राजन विचारे, ठाणे शहर भाजपचे शहराध्यक्ष संदीप लेले, आमदार निरंजन डावखरे तसेच शिवसेना भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते.
दुसरीकडे काँग्रेसच्या यादीमध्ये हिरालाल भोईर यांचे गुरुवारी रात्री नाव जाहीर होऊनदेखील त्यांनी आईच्या प्रकृतीच्या कारणामुळे माघार घेतली. तर भाजपातून काही दिवसांपूर्वी बाहेर पडलेले माजी नगरसेवक घाडीगावकर यांनी शुक्रवारी सकाळी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.
कदम यांचा अर्ज दाखल
मनसेचे महेश कदम यांनी गुरुवारी अर्ज दाखल केला होता. मात्र, तांत्रिक कारणास्तव अर्ज भरू शकले नाही. शुक्रवारी त्यांनी पुन्हा उमेदवारी अर्ज भरला. ते ठाणे शहरमधून इच्छुक होते. मात्र, जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांना या मतदारसंघातून तिकीट मिळाले.