कल्याण पश्चिम; मतदारांचा संमिश्र प्रतिसाद

By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2019 02:37 AM2019-10-22T02:37:31+5:302019-10-22T02:37:38+5:30

Maharashtra Election 2019: ईव्हीएममधील घोळ, बोगस मतदानाच्या तुरळक घटना वगळता सोमवारी कल्याण पश्चिमेत मतदान शांततेत झाले.

Maharashtra Election 2019: kalyan West; Voters' composite response | कल्याण पश्चिम; मतदारांचा संमिश्र प्रतिसाद

कल्याण पश्चिम; मतदारांचा संमिश्र प्रतिसाद

Next

कल्याण : ईव्हीएममधील घोळ, बोगस मतदानाच्या तुरळक घटना वगळता सोमवारी कल्याण पश्चिमेत मतदान शांततेत झाले. या मतदारसंघात अंदाजे ४१.९३ टक्के मतदान झाले. शिवसेना, मनसे आणि भाजपचे बंडखोर उमेदवार यांच्यात येथे लढत होत असून मतदारांना बाहेर काढण्यासाठी चुरस लागली होती. पावसाने उसंत घेतली तरी मतदारांचा प्रतिसाद संमिश्रच दिसून आला.

शिवसेनेचे विश्वनाथ भोईर, मनसेचे प्रकाश भोईर आणि भाजप बंडखोर अपक्ष उमेदवार नरेंद्र पवार यांसह १७ उमेदवारांचे भवितव्य मतदानयंत्रात बंद झाले. विश्वनाथ भोईर आणि त्यांच्या पत्नी वैशाली भोईर यांनी उंबर्डे येथील केंद्रावर, तर प्रकाश भोईर आणि त्यांच्या पत्नी नयना भोईर यांनी बेतूरकरपाडा परिसरातील शिशुविकास शाळा येथे मतदानाचा हक्क बजावला. अपक्ष उमेदवार नरेंद्र पवार व त्यांच्या पत्नी हेमा यांनी मोहिंदरसिंग काबुलसिंग महाविद्यालयात मतदान केले. काँग्रेसच्या उमेदवार कांचन कुलकर्णी यांनी पतीसह एल.डी. सोनावणे महाविद्यालयात मतदान केले.

कल्याण पश्चिमेत चार लाख ४४ हजार मतदार आहेत. यावेळी सुमारे एक लाख मतदार वाढले आहेत. पश्चिमेतील ४०९ मतदानकेंद्रावर सकाळपासूनच मतदानासाठी रांगा पाहायला मिळाल्या. याठिकाणी असलेल्या मतदारयाद्यांमध्ये नाव शोधण्यासाठी मतदारांची दिवसभर गर्दी होती. दिव्यांग आणि रुग्ण, वयोवृद्ध मतदारांसाठी वाहनांची व्यवस्था करण्यात आली होती. सात ठिकाणी ईव्हीएम बंद पडल्याच्या घटना घडल्या. मात्र, अर्ध्या तासात पूर्ववत मतदानप्रक्रिया सुरू झाली.दुपारी ४ नंतर कार्यकर्त्यांनी घरोघरी जाऊ न मतदारांना मतदानासाठी केंद्रावर आणल्याने मतदानामध्ये थोड्याफार प्रमाणात वाढ झाली.

बोगस मतदानाचा प्रकार

कल्याण पश्चिमेतील चिखलेबागमध्ये राहणाऱ्या अश्विनी पवार या मुलगी आणि पतीसह केडीएमसी मुख्यालयात असलेल्या २०१ मतदानकेंद्रावर आल्या होत्या. मात्र, मतदानकेंद्रावर त्यांच्या नावे आधीच मतदान झाल्याची नोंद होती. त्यामुळे दोन तासांच्या प्रतीक्षेनंतर अश्विनी यांनी सादर केलेले मतदार ओळखपत्र, पॅनकार्ड आणि आधारकार्डच्या आधारे मतपत्रिकेद्वारे मतदान घेण्यात आले.

उमेदवाराला ईव्हीएम बिघाडाचा फटका

बिर्ला महाविद्यालय येथील एका मतदानकेंद्रावर मतदानासाठी गेलेल्या अपक्ष उमेदवार नोवेल साळवे यांना येथील ईव्हीएम मशीन सकाळी ७ वाजता बंद असल्याचे निदर्शनास आले. साधारण २० ते ३० मिनिटांनंतर पुन्हा हे मशीन सुरू झाल्यानंतर त्यांनी मतदानाचा हक्क बजावला.

Web Title: Maharashtra Election 2019: kalyan West; Voters' composite response

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.