आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे

By ऑनलाइन लोकमत | Published: May 3, 2024 06:19 AM2024-05-03T06:19:28+5:302024-05-03T06:20:54+5:30

बालेकिल्ला राखण्यासाठी केलेल्या खणखणीत युक्तिवादाचे मिळाले फळ

lok sabha election 2024 thane lok sabha Anand Dighe Chief Minister eknath Shinde | आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे

आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे

ठाणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या करिष्म्यामुळे जर भाजपचे उमेदवार निवडून येणार आहेत तर शिवसेनेचेही येतील. त्याबद्दल भाजपच्या कुठल्याही नेत्याच्या मनात शंका आहे का, असा रोकडा सवाल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाजपच्या नेत्यांना अखेरच्या बैठकीत केला. त्यामुळे अखेर ठाणे लोकसभा मतदारसंघ शिंदेसेनेला सुटला. १९९६ मध्ये स्व. आनंद दिघे यांनीही अशाच पद्धतीने आक्रमक पवित्रा घेत भाजपला निरुत्तर केले होते. शिंदे यांनी दिघे यांच्याच पावलावर पाऊल ठेऊन अखेर आपला बालेकिल्ला राखला.

ठाणे लोकसभा मतदारसंघावर भाजपने दावा केला होता. भाजपचे काही नेते प्रचार करू लागले होते. त्यामुळे शिंदेसेना बुचकळ्यात पडली होती. ठाणे मतदारसंघाची चर्चा सुरू झाल्यावर शिंदेसेनेच्या वेगवेगळ्या उमेदवारांबद्दल वेगवेगळे मुद्दे उपस्थित केले जात होते. शेवटी अखेरच्या बैठकीत शिंदे यांनी भाजपच्या नेत्यांना थेट सवाल केला की, मोदींचा करिष्मा जर भाजपच्या उमेदवारांना निवडून देणार असेल तर शिंदेसेनेच्या उमेदवारांना तो निवडून देण्याबाबत कुणाच्या मनात शंका आहे का? उद्धव ठाकरे यांच्यासोबत भाजपची युती असताना मोदींच्या करिष्म्यामुळे शिवसेनेचे खासदार विजयी झाले व त्यानंतर ठाकरे यांनी महाविकास आघाडी स्थापन केली.

हाच जर भाजपचा आक्षेप आहे तर मग आता ठाण्यात शिंदेसेनेचा उमेदवार असण्याला विरोध का? मी शिवसेनेतून एवढ्या मोठ्या संख्येने खासदार, आमदार घेऊन सोबत आलो. निवडणूक चिन्ह, पक्षाचे नाव सारे काही खेचून आणले. आता हे सर्व टिकवायचे तर मला पुरेशा जागा देणे ही भाजपचीही गरज नाही का? मला पक्षाची मान्यता टिकवण्याकरिता विशिष्ट मतांची टक्केवारी मिळवायला हवी. त्याकरिता तेवढ्या जागा भाजपने सोडायला हव्या, असा युक्तिवाद शिंदे यानी भाजप नेत्यांसमोर केला. या बिनतोड युक्तिवादामुळे भाजप नेते निरुत्तर झाले.

 ठाणे लोकसभा मतदारसंघ १९९६ मध्ये जेव्हा शिवसेनेने भाजपकडे मागितला तेव्हा राम कापसे व स्थानिक भाजप, रा. स्व. संघाच्या नेत्यांनी विरोध केला.

 मातोश्रीवर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, प्रमोद महाजन यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत आनंद दिघे यांनी आक्रमक पवित्रा घेत ठाणे जर सेनेला सोडले नाही तर, पुन्हा भाजपचा उमेदवार विजयी होणार नाही, असा कठोर पवित्रा घेतला होता.

 त्यामुळे मुंबई, ठाणे काबीज करणे ही भाजपची गरज नव्हती. कारण तेथे शिवसेना भक्कम होती व महाजन यांना ठाण्याकरिता युतीवर विस्तव ठेवायचा नव्हता. शिंदे यांनी दिघे यांचेच अनुकरण करून पुन्हा ठाणे राखल्याचे सांगण्यात आले.

Web Title: lok sabha election 2024 thane lok sabha Anand Dighe Chief Minister eknath Shinde

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.