राजाश्रय दिलेले गुंड तुमच्या अंगावर आले तर नवल वाटायला नको; जितेंद्र आव्हाडांचा खोचक टोला

By अजित मांडके | Published: May 3, 2024 04:56 PM2024-05-03T16:56:57+5:302024-05-03T17:02:10+5:30

शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

lok sabha election 2024 jitendra awhad controversial statement against shinde group naresh mhaske | राजाश्रय दिलेले गुंड तुमच्या अंगावर आले तर नवल वाटायला नको; जितेंद्र आव्हाडांचा खोचक टोला

राजाश्रय दिलेले गुंड तुमच्या अंगावर आले तर नवल वाटायला नको; जितेंद्र आव्हाडांचा खोचक टोला

अजित मांडके, ठाणे : ज्या गुंडांना गेल्या अडीच वर्षांत राजाश्रय देण्यात आला होता. त्या गुंडांनीच शिवसेनेच्या रॅलीत टोळीयुद्ध घडविले. हे गुंड कुणाचेच नसतात. आज ते एकमेकांच्या अंगावर गेले; उद्या ते तुमच्या अंगावर आले तर नवल वाटायला नको, अशा शब्दात शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

शिंदे सेनेचे उमेदवार नरेश म्हस्के हे आपला उमेदवारी अर्ज भरण्यास जात असताना त्यांच्या रॅलीत सहभागी गुंडांमध्ये टोळीयुद्ध झाले. यासंदर्भात आव्हाड यांनी एक्स पोस्ट करून टीका केली. आपण जे पेरतो, तेच उगवत असतं. शिवसेनेचे लोकसभेचे उमेदवार आपला अर्ज भरायला जात असताना,  ज्या गुंडांना गेली अडीच वर्षे राजाश्रय दिला होता; त्या गुंडांच्या टोळ्यांमध्ये भररस्त्यात उघडपणे मारामारी झाली. स्वतः मुख्यमंत्री ज्या पक्षाचे प्रमुख आहेत, ते ज्या शहरात राहतात; त्याच शहरात त्यांच्या पक्षाच्या उमेदवाराची मिरवणुकीत टोळीयुद्ध होणार असेल तर हे महाराष्ट्रासाठी लज्जास्पद आहे. पूर्ण महाराष्ट्रात ठाण्याची लाज गेली. माझी खात्री आहे, पोलीस याच्यावर कुठलीही कारवाई करणार नाहीत. एखादा गुन्हा असलेल्यांना तडीपार करण्याच्या ऑर्डर काढणाऱ्या पोलिसांचे मला कौतूक वाटते. 

ज्या दोन गुंड टोळ्यांमध्ये टोळीयुद्ध झाले. त्या टोळ्यांचे म्होरके हे कित्येक खुनाच्या गुन्ह्यांमध्ये आरोपी आहेत. मात्र, त्यांच्यावर कोणत्याही प्रकारची कारवाई होणार नाही. जणूकाही ते प्रशासनाचे जावई आहेत.  म्हणूनच आपण कोणाला जवळ ठेवतो आणि कोणाला मोठं करतो, याचे भान प्रत्येक राजकीय पक्षाने ठेवायला हवे. आज ते एकमेकांच्या अंगावर गेलेत. कारण ते कुणाचेच नसतात. उद्या ते तुमच्या अंगावर आले तर नवल वाटायला नको, असे आपल्या एक्स पोस्टमध्ये म्हटले आहे.

Web Title: lok sabha election 2024 jitendra awhad controversial statement against shinde group naresh mhaske

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.