शिंदे २०१३ ला काँग्रेसमध्ये जाणार होते; राजन विचारे यांचा दावा

By अजित मांडके | Published: May 6, 2024 08:19 PM2024-05-06T20:19:18+5:302024-05-06T20:20:27+5:30

टेंभी नाक्याच्या देवीसमोर लागणारे बॅनर काढून त्याठिकाणी शिंदे यांनी स्वत:चे बॅनर लावले. आनंद दिघे यांच्या आनंद आश्रमाची पाटी काढून तेथे स्वत:च्या नावाची पाटी लावली. त्यामुळे दिघे यांच्यावरील प्रेम काय होते, हे मला बोलायला लावू नका असा इशाराही विचारे यांनी दिला.

lok sabha election 2024 eknath Shinde was going to join the Congress in 2013 Rajan Vikhare's claim | शिंदे २०१३ ला काँग्रेसमध्ये जाणार होते; राजन विचारे यांचा दावा

शिंदे २०१३ ला काँग्रेसमध्ये जाणार होते; राजन विचारे यांचा दावा

अजित मांडके

ठाणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे २०१३ मध्ये ते पाच आमदारांना घेऊन काँग्रेसमध्ये प्रवेश करणार होते, वारंवार त्यांनी बंड करण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या शेवटच्या बंडापर्यंत मी त्यांच्यासोबत होतो. मात्र त्यांना केवळ शिवसेना संपावयाचीच होती असा गंभीर आरोप ठाकरे गटाचे उमेदवार राजन विचारे यांनी केला. नरेश म्हस्के देखील शिंदे यांना वैतागून काँग्रेसमध्ये जाणार होते, मात्र त्याला देखील मीच रोखले होते असेही ते म्हणाले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महायुतीच्या बैठकीत केलेल्या आरोपांना राजन विचारे यांनी प्रतिउत्तर दिले. आमच्यामुळेच विचारे निवडून येत होते, असे देखील शिंदे म्हणाले होते. मात्र मागील दोन निवडणुकीत केवळ आपल्या पुत्राचेच काम शिंदे यांनी केले. मी माझ्या कामावर निवडून आलो असल्याचा दावाही त्यांनी केला. शिंदे यांनी केलेले बंड फोडलेली शिवसेना हे सर्व केवळ खुर्चीसाठीच होते, असाही आरोप त्यांनी यावेळी केला.

आम्ही सिनेमा काढला म्हणतात, मात्र आम्ही आमच्या पैशाने तिकीटे काढून सिनेमा दाखवला. तुम्ही कुठे खर्च केला. कार्यकर्त्यांनी खर्च केला असून खोटे सिनेमा काढता म्हणजे दिघे यांच्यावर त्यांचे किती प्रेम होते हे यातून दिसत आहे, असेही ते म्हणाले. शिंदे यांनी पहिले आमदराकीचे तिकीट मीच मिळवून दिले. असे आरोप करण्यापेक्षा दोन वर्षात विकास कामे काय केली. ठाण्यासाठी काय काय केले त्याची उत्तरे आधी द्या असा सवालही त्यांनी केला.

तुम्ही तुमच्या स्वार्थासाठी शिवसेना तोडली, काँग्रेस, राष्ट्रवादी फोडली. केवळ सेटींगचेच राजकारण तुम्ही केले. नरेश म्हस्के कोरोना काळात कुठे होता, घरात बसून होता. महापौर पदाच्या कारर्कीद काय काम केले हे सांगावे. केवळ गोल्डन गँगचा लिडर म्हणूनच त्याची प्रचिती होती. ठाणे महापालिका लुटण्याचे काम म्हस्के याने केले, असा आरोपही त्यांनी केला.

टेंभी नाक्याच्या देवीसमोर लागणारे बॅनर काढून त्याठिकाणी शिंदे यांनी स्वत:चे बॅनर लावले. आनंद दिघे यांच्या आनंद आश्रमाची पाटी काढून तेथे स्वत:च्या नावाची पाटी लावली. त्यामुळे दिघे यांच्यावरील प्रेम काय होते, हे मला बोलायला लावू नका असा इशाराही त्यांनी दिला.

Web Title: lok sabha election 2024 eknath Shinde was going to join the Congress in 2013 Rajan Vikhare's claim

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.