कर्नाटक, केरळी युवकांच्या भावना; कोरोना गेल्यानंतर सोलापुरात पुन्हा कामाला येऊ...!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2020 12:10 PM2020-04-22T12:10:04+5:302020-04-22T12:16:54+5:30
चिंता रोजगाराची : सध्या काम नसल्याने थांबणे अशक्य असल्याचेही व्यक्त केले मत
सोलापूर : आम्ही मागील दोन वर्षांपासून सोलापुरात काम करत आहोत. इतके दिवस आम्हाला कसलाही त्रास झाला नव्हता. कोरोना आजारामुळे अडचणी आल्या. आता इथे काम नसल्याने थांबणे अशक्य झाले आहे. गावाकडे कधी पोहोचू माहिती नाही. पण कोरोना गेल्यानंतर सोलापुरात पुन्हा कामाला येऊ, असा विश्वास कर्नाटक व केरळमधील तरुणांनी बोलून दाखविला.
शहरामध्ये एका शेतीसंबंधित कंपनीमध्ये मार्केटिंंगचे काम करणारे काही तरुण व तरुणी मागील दोन वर्षांपासून राहतात. त्यांच्या वस्तूंचे मार्के टिंग करतात. मिळालेल्या पैशातून आपला खर्च भागवत काही पैसे घरी पाठवतात. असे सुमारे २० तरुण सोलापूर सोडून त्यांच्या मूळ गावी जात आहेत. त्यातील काही तरुण हे म्हैसूर, उडुपी, विजयपूर तसेच केरळ येथील कासरगोड जिल्ह्यातील आहेत. यातील काही तरुण हे दोन वर्षे तर काही जण हे सहा महिन्यांपासून सोलापुरात मार्केटिंगचे काम करतात. सैफुल परिसरात त्यांची कंपनी असून, याच परिसरात ते वास्तव्यास होते.
सध्या काम नसल्याने इथे थांबून काही उपयोग नाही. शासकीय रुग्णालयात कोणताही आजार नसल्याचे तपासणी केल्यानंतर स्पष्ट झाले आहे. सिव्हिल हॉस्पिटल ते सैफुलपर्यंत चालत आलो आहे. आता आम्हाला इथूून आमच्या गावी जायचे आहे. वाहन मिळेल की नाही, घरी कधी पोहोचू माहिती नाही. पण कोरोना आजार गेल्यानंतर सोलापुरात कामासाठी पुन्हा येणार असल्याचा विश्वास या तरुणांनी बोलून दाखविला.
खाण्याची पद्धत वेगळी
कोरोना आजाराचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून भारतात लॉकडाउन करण्यात आले, तेव्हापासून ते त्यांच्या घरीच होते. त्यांच्या खाण्याची पूर्ण सोय प्रशासनाने केली असल्याचे या तरुणांनी सांगितले. सोलापुरातील प्रशासनाने आमची चांगली सोय केली. जेवणही वेळेवर मिळत होते. पण, आमची खाण्याची पद्धत वेगळी असल्याने पोट भरून खाऊ शकत नव्हतो.