पवारांची सभा सुरू होती, रोहित पवारांनी 'ती' माहिती दिली अन् अभिजीत पाटील अचानक निघून गेले!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2024 03:53 PM2024-04-26T15:53:43+5:302024-04-26T15:56:25+5:30

करमाळ्यात सभा सुरू असतानाच राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते अभिजीत पाटील यांना धक्का बसला आहे.

mla Rohit Pawar gave information about bank action and Abhijit Patil suddenly left | पवारांची सभा सुरू होती, रोहित पवारांनी 'ती' माहिती दिली अन् अभिजीत पाटील अचानक निघून गेले!

पवारांची सभा सुरू होती, रोहित पवारांनी 'ती' माहिती दिली अन् अभिजीत पाटील अचानक निघून गेले!

Abhijeet Patil ( Marathi News ) : माढा लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांच्या प्रचारार्थ करमाळा इथं आज राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत जाहीर सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. मात्र ही सभा सुरू असतानाच राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते अभिजीत पाटील यांना धक्का बसला. कारण पाटील यांच्या  श्री विठ्ठल सहकारी साखर कारखाना लि. वेणूनगर-गुरसाळे या कारखान्याच्या ३ गोडाऊनला महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह बँकेच्या अधिकाऱ्यांनी शुक्रवारी सिल केलं आहे. भरसभेत शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी ही माहिती अभिजीत पाटील यांना देताच ते ताडकन् उठले आणि पंढरपूरच्या दिशेने रवाना झाले.

बँकेकडून करण्यात आलेल्या कारवाईनंतर अभिजीत पाटील यांनी याप्रकरणी आपली बाजू मांडली आहे. "न्यायालयात केस सुरू होती. कारवाईला न्यायालयाने दिलेला स्टे कालच उठला आणि आज सकाळी तात्काळ अधिकाऱ्यांनी गोडाऊन सील केलं आहे. १ लाख पोती साखर शिल्लक आहे. साखर विकून शेतकऱ्यांची भेट द्यायची होती," असं अभिजीत पाटलांनी म्हटलं आहे. 

पंढरपूरमध्ये होणार शरद पवारांची सभा

लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी अभिजीत पाटील यांनी आज सायंकाळी पंढरपूर इथं शरद पवारांच्या सभेचं आयोजन केलं आहे. मात्र ही सभा होण्यापूर्वीच पाटील यांच्या कारखान्यावर कारवाई करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. 

करमाळ्यात मविआला ताकद

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचे करमाळ्यातील माजी आमदार नारायण पाटील यांना आपल्याकडे खेचण्यात शरद पवारांना यश मिळालं आहे. करमाळा येथील जाहीर सभेत नारायण पाटील यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला आहे. करमाळ्याचे विद्यमान आमदार संजय जगताप हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीत आहेत. त्यामुळे नारायण पाटील यांनी शरद पवारांसोबत जाण्याचा निर्णय घेतल्याचं दिसत आहे. धैर्यशील मोहिते पाटलांच्या राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षातील प्रवेश सोहळ्यावेळीही नारायण पाटील उपस्थित होते. त्यामुळे तेही पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करतील, असं सांगितलं जात होतं. अखेर या चर्चेवर आज शिक्कामोर्तब झालं असून पाटील यांनी हाती तुतारी घेतली आहे.

Web Title: mla Rohit Pawar gave information about bank action and Abhijit Patil suddenly left

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.