Sindhudurg: उद्योगासाठी कवडीमोल दराने घेतलेल्या जमिनी परत द्या, डॉ. जयेंद्र परूळेकर यांची मागणी
By अनंत खं.जाधव | Published: May 2, 2024 12:37 PM2024-05-02T12:37:46+5:302024-05-02T12:39:14+5:30
लवकरच उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करणार
सावंतवाडी : उद्योग धंद्याच्या नावाखाली मायनिंग करण्यासाठी शेतकऱ्यांच्या कवडीमोल दराने घेण्यात आलेल्या जमिनी परत देण्यात याव्यात ज्या जमिनी घेण्यात आल्यात तो परिसर पूर्णपणे इकोसेन्सिटिव्ह आहे. त्यामुळे याठिकाणी विनाशकारी प्रकल्प होणार नाहीत. त्यासाठीच शेतकऱ्यांना जमिनी परत दिल्या जाव्यात अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते डॉ. जयेंद्र परूळेकर यांनी प्रसिद्धीस देण्यात आलेल्या पत्रकातून केली आहे. तसेच लवकरच या विरोधात उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करणार असल्याचे परूळेकर यांनी म्हटले आहे.
उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सावंतवाडी, दोडामार्ग तालुक्यातील बहुतांश गावे इकोसन्सेटिव्ह म्हणून जाहीर झाली आहेत. यातील १६ गावात प्रस्तावित असलेले मायनिंग प्रकल्प होण्यासाठी जमिनी खरेदी करण्यात आल्या आहेत. या सर्व जमिनी तेव्हा शेतकऱ्यांकडून कवडीमोल दराने घेण्यात आल्या आहेत. मात्र जमिनी खरेदी केल्यानंतर मागील पंधरा ते वीस वर्षात या जमिनीवर कोणताही प्रकल्प उभारण्यात आला नाही. त्यामुळे आता या जमिनी तशाच पडू नये या जमिनीवर कोणताही उद्योग येत नसेल तर आणि जमीन खरेदीनंतर उद्योग धंद्यासाठी असलेला कालावधी संपला असला तर या सर्व जमिनी शेतकऱ्यांना परत दिल्या जाव्यात अशी मागणी डॉ.परूळेकर यांच्याकडून करण्यात आली आहे.
तसेच संबधित शेतकर्यांच्या जमिनी परत पुन्हा मिळाव्यात यासाठी वनशक्ती फाउंडेशनच्या माध्यमातून उच्च न्यायालयात जनहीत याचिका दाखल करण्यात येणार आहे. अशी भूमिका डॉ. परुळेकर यांनी घेतली.