अपघातात पादचाऱ्याचा जागीच मृत्यू; जानवलीत संतप्त ग्रामस्थांचे रास्ता रोको आंदोलन, महामार्गावर वाहतूक कोंडी

By सुधीर राणे | Published: May 18, 2024 01:58 PM2024-05-18T13:58:50+5:302024-05-18T14:00:25+5:30

महामार्ग प्राधिकरणवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी 

angry villagers protested after the death of a pedestrian in an accident In Janwali Sindhudurg | अपघातात पादचाऱ्याचा जागीच मृत्यू; जानवलीत संतप्त ग्रामस्थांचे रास्ता रोको आंदोलन, महामार्गावर वाहतूक कोंडी

अपघातात पादचाऱ्याचा जागीच मृत्यू; जानवलीत संतप्त ग्रामस्थांचे रास्ता रोको आंदोलन, महामार्गावर वाहतूक कोंडी

कणकवली : कणकवली पासून जवळच मुंबई-गोवा महामार्गावर जानवली प्राथमिक शाळेनजीक रस्त्याने चालत जाणाऱ्या पादचाऱ्याला कारने दिलेल्या धडकेत अनिल कृष्णा कदम (वय ५६, रा. जानवली बौद्धवाडी) यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेला चौवीस तास उलटून गेले आहेत. त्यामुळे जोपर्यंत त्या कारचालकाला पोलिस अटक करत नाही, तसेच महामार्ग प्राधिकरणवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील असा इशारा देत संतप्त जानवली ग्रामस्थानी महामार्गावर 'रास्ता रोको' केला. तीन तासाहून अधिक काळ महामार्ग रोखून धरल्याने सुमारे चार किलोमीटर अंतरापर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. 

आंदोलनाची माहिती मिळताच घटनास्थळी सहायक पोलिस निरीक्षक मनोज पाटील यांच्यासह पोलिस पथक दाखल झाले होते. पोलिसांशी चर्चा करताना ग्रामस्थांनी प्रांताधिकाऱ्यांना घटनास्थळी बोलवा, आम्हाला त्यांच्याशी चर्चा करायची आहे. महामार्गावर वारंवार अपघात होवून त्यात अनेक बळी जात आहेत.त्याला महामार्ग प्राधिकरण जबाबदार आहे. त्यामुळे जोपर्यंत महामार्ग प्राधिकरणवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होत नाही, तोपर्यंत आम्ही मागे हटणार नाही अशी भूमिका  मांडली.

मृत अनिल कदम हे गवंडी काम करत होते.  शुक्रवारी सकाळी ते मुंबई गोवा महामार्गावरून चालत कामावर जात होते. त्यादरम्यान गोव्याच्या दिशेने भरधाव वेगाने जाणाऱ्या पांढऱ्या, पिवळ्या रंगाच्या पट्ट्या असलेल्या परमिट कारने त्यांना धडक दिली होती. त्यानंतर तो कारचालक तिथे न थांबता गोव्याच्या दिशेने भरधाव वेगाने पळून गेला. ही धडक एवढी जोरदार होती की अनिल कदम त्यांच्या डोक्याला गंभीर मार लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.  त्यामुळे जानवली ग्रामस्थ आक्रमक झाले.

गुरुवारी कणकवली पोलिस ठाण्यास भेट देत अनिल कदम यांना धडक देऊन पलायन केलेल्या कारचालकाला लवकरात लवकर ताब्यात घेवून कठोर कारवाईची मागणी ग्रामस्थांनी केली. तसेच जोपर्यंत कारवाई होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचा इशारा पोलिसांना दिला होता. तर शनिवारी सकाळ पासून जानवली येथे रास्ता रोको आंदोलन सुरू केले आहे.

Web Title: angry villagers protested after the death of a pedestrian in an accident In Janwali Sindhudurg

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.