प्रतापसिंहनगरात तलवार, काेयत्याने १५ वाहनांची तोडफोड; गुंड लल्लन जाधवसह पाच जणांचे कृत्य
By दत्ता यादव | Published: March 20, 2024 04:10 PM2024-03-20T16:10:36+5:302024-03-20T16:11:45+5:30
संशयित चार जण ताब्यात
सातारा : शहरालगत असलेल्या प्रतापसिंहनगरात गुंड अजय उर्फ लल्लन जाधव (वय २४, रा. प्रतापसिंहनगर, सातारा) याने साथीदारांच्या मदतीने हातात तलवार, कोयता घेऊन तब्बल १५ हून अधिक वाहनांची तोडफोड केली. यामध्ये सुमारे दोन लाखांचे नुकसान झाले आहे. ही घटना बुधवारी रात्री दोनच्या सुमारास घडली. याप्रकरणी पोलिसांनी चाैघांना ताब्यात घेतले असून, लल्लन जाधव पसार झाला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, प्रतापसिंहनगरमध्ये बुधवारी रात्री अजय उर्फ लल्लन जाधव याने साथीदारांना सोबत घेऊन तलवारीने दहशत माजवली. एका व्यक्तीवर कोयत्याने वार केला. यामध्ये संबंधित व्यक्ती जखमी झाली असून, त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. संबंधितांनी रस्त्याच्याकडेला पार्क केलेली वाहने कोयत्याने फोडण्यास सुरुवात केली. या आवाजामुळे नागरिक झोपेतून उठून बाहेर आले. मात्र, हल्लेखोरांच्या हातात तलवार, कोयते असल्यामुळे त्यांना कोणीही विरोध केला नाही.
‘गाड्या फोड,’ असे ओरडून एकमेकांना हल्लेखोर सांगत होते. हा वाद मुलीच्या कारणावरून झाला असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. गाड्यांची तोडफोड केल्यानंतर दहा मिनिटांत दहा हल्लेखोर तेथून पसार झाले. या प्रकाराची माहिती सातारा शहर पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी धरपकड करून चाैघा संशयितांना ताब्यात घेतले. मात्र, गुंड लल्लन जाधव पसार झाला. दरम्यान, या प्रकरणामध्ये अद्यापही शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला नव्हता.