आत्मनिर्भर पिढी घडविणे ही आपली जबाबदारी - शरद पवार 

By सचिन काकडे | Published: May 9, 2024 05:18 PM2024-05-09T17:18:15+5:302024-05-09T17:18:36+5:30

रयत शिक्षण संस्थेने ऑक्सफर्ड विद्यापीठाशी करार केला असून, रयतच्या विद्यार्थ्यांना अद्ययावत शिक्षणाची कवाडे खुली होणार

It is our responsibility to create a self reliant generation says Sharad Pawar | आत्मनिर्भर पिढी घडविणे ही आपली जबाबदारी - शरद पवार 

आत्मनिर्भर पिढी घडविणे ही आपली जबाबदारी - शरद पवार 

सातारा : ‘जागतिक पटलावर शैक्षणिक क्षेत्रात बरेच बदल होत आहेत. या बदलाची नोंद घेऊन रयत शिक्षण संस्थेने ऑक्सफर्ड विद्यापीठाशी करार केला असून, रयतच्या विद्यार्थ्यांना अद्ययावत शिक्षणाची कवाडे खुली होणार आहेत. विद्यार्थ्यांचा बौद्धिक, गुणात्मक विकास साधत असताना आत्मनिर्भर पिढी घडविणे ही आपली जबाबदारी आहे, असे मत रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष तथा खासदार शरद पवार यांनी व्यक्त केले.

रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या ६५व्या पुण्यतिथी निमित्त गुरुवारी (दि. ९) सातारा येथील रयत शिक्षण संस्थेच्या मुख्य कार्यालयात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. याप्रसंगी खासदार श्रीनिवास पाटील, आमदार शशिकांत शिंदे, आमदार बाळासाहेब पाटील, विश्वजित कदम, संस्थेचे चेअरमन चंद्रकांत दळवी, व्हॉइस चेअरमन भगीरथ शिंदे, संघटक डॉ. अनिल पाटील, सचिव विकास देशमुख, आमदार सुमन पाटील, भारती विद्यापीठाचे कुलपती डॉ. शिवाजीराव कदम, रामशेठ ठाकूर, प्राचार्य डॉ. ज्ञानदेव म्हस्के, प्राचार्य डॉ. शिवलिंग मेनकुदळे, प्रभाकर देशमुख, शफीक शेख यांच्यासह रयत सेवक उपस्थित होते.

कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या कार्याचा आढावा घेऊन शरद पवार म्हणाले, उद्योग, आरोग्य व शिक्षण अशा विविध क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर केला जात आहे. आपण याबाबत ऑक्सफर्ड विद्यापीठाशी करार केला असून, रयतच्या विद्यार्थ्यांना अद्ययावत शिक्षणाची दारे खुली होणार आहेत. गुणवत्ता हा आज महत्त्वाचा भाग असून सतत बदल होत आहेत, या सर्वांना सामोरे जाण्यासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज असून, संस्थेची वाटचाल त्या दृष्टीने सुरू आहे. संस्थेचे काम अत्यंत पारदर्शी असून दीड-दोन वर्षांत केलेल्या काही धोरणात्मक बदलांचे चांगले परिणाम आता दिसू लागले आहेत. 

चेअरमन चंद्रकांत दळवी यांनी रयत शिक्षण संस्थेची कार्यदर्शिका, वार्षिक अहवाल, सीआयआयआय सेंटर, ऑक्सफर्ड विद्यापीठ, केम्ब्रिज, साउथ कोरियन सामंजस्य करार, कुंभोज येथील प्रशिक्षण केंद्र, नवीन शैक्षणिक धोरण याविषयी माहिती दिली. सचिव विकास देशमुख यांनी संस्थेच्या कार्याचा आढावा घेतला, तर डॉ. अनिल पाटील यांनी भविष्याचा वेध घेत रयत संस्थेकडून राबविल्या जाणाऱ्या विविध गुणवत्तापूर्ण उपक्रमांची माहिती दिली. कार्यक्रमास रयत सेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.  प्रा. डॉ. सविता मेनकुदळे यांनी सूत्रसंचालन केले. तर प्राचार्य डॉक्टर ज्ञानदेव म्हस्के यांनी आभार मानले.

स्मृती भवन इमारतीचा शुभारंभ..

रयत संस्थेतील कर्मवीर स्मृती भवन इमारतीचे संस्थेकडून नूतनीकरण करण्यात आले आहे. या इमारतीचे शरद पवार यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. तसेच संस्थेच्या वार्षिक अहवालाचे व कर्मवीर विद्याप्रबोधिनीच्या शब्दगंध अंकाचे प्रकाशनही प्रमुख मान्यवरांच्या हस्ते पार पडले. गुणवंत विद्यार्थी व शिक्षकांचा गौरव सोहळा लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे रद्द करण्यात आला असला तरी लवकर तो आयोजित केला जाईल, अशी माहिती यावेळी देण्यात आली.

Web Title: It is our responsibility to create a self reliant generation says Sharad Pawar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.