येरळा नदीवरील पाऊण कोटींचा बंधारा अवघ्या दोन दिवसांत कोसळला, तीन वेळा वाढीव निधी खर्च
By ऑनलाइन लोकमत | Published: July 22, 2022 11:39 AM2022-07-22T11:39:26+5:302022-07-22T11:53:39+5:30
गुणवत्ता तपासण्याची तसदी न घेता मृद व जलसंधारण विभागाने देयके पूर्ण करून हिशोब क्लिअर केल्याची धक्कादायक माहिती माहितीच्या अधिकारातून उघड
सातारा : खटाव तालुक्यात येरळा नदीवर सहा वर्षांत तीनवेळा वाढीव निधी खर्च करण्यात आला. तब्बल ८० लाख रुपये खर्च करून बांधण्यात आलेला हा बंधारा अवघ्या दोन दिवसांतच कोसळला. वायू वेगाने याची माहिती पसरल्यानंतर पुन्हा या कामासाठी वाढीव १६ लाखांचा दुरुस्ती निधी देऊन बंधारा बांधला खरा; पण त्याची गुणवत्ता तपासण्याची तसदी न घेता मृद व जलसंधारण विभागाने देयके पूर्ण करून हिशोब क्लिअर केल्याची धक्कादायक माहिती माहितीच्या अधिकारातून उघड झाली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, येरळा नदीवर ५५ लाख ६६ हजार रुपये खर्च करून बंधारा बांधण्यात आला. याचे काम निकृष्ट दर्जाचे झाल्यामुळे २०१८-२०१९ मध्ये त्याच बंधाऱ्याची उंची वाढविण्यासाठी अंदाजपत्रक तयार करून १० लाख ७८ हजार रुपयांचा खर्च केले गेला. धक्कादायक बाब म्हणजे बंधारा दोन दिवसांत पडल्यानंतर अधिकारी व ठेकेदार यांनी विचारविनिमय करून पुन्हा यासाठी निधी जिरविण्याची योजना आखली.
त्यानुसार बंधारा दुरुस्तीचे काम तब्बल १६ लाख ४१ हजार ८३६ रुपयांचे मंजूर करण्यात आले. विशेष म्हणजे गुणवत्ता न तपासता याचे देयक मार्च २०२१ मध्ये मंजुरीसाठी सादर करण्यात आले. प्रत्यक्ष बंधारा भेट देऊन कामाची पाहणी करणे अपेक्षित असतानाही निकृष्ट दर्जाचे, मोजमापमध्ये तफावत असे काम केल्याचे उघड झाले आहे.
मृद व जलसंधारण कार्यालय सातारा कोणतीही माहिती या बंधाऱ्याबाबत देत नाही व एकाच छोट्या बंधाऱ्यावर सात वर्षांत ९० लाख खर्च करतात. ही निव्वळ शासनाची फसवणूक व शासनाच्या पैशाची उधळपट्टी आहे, तरी याची सर्व चौकशी करून संबंधित अधिकारी व ठेकेदार यांच्यावर कारवाई करावी.