सांगलीची सिंचनासाठी मागणी कमी; कोयनेतून विसर्ग घटला

By नितीन काळेल | Published: April 25, 2024 03:52 PM2024-04-25T15:52:16+5:302024-04-25T15:53:24+5:30

सध्या किती क्यूसेकने विसर्ग सुरु तसेच धरणातील शिल्लक पाणीसाठा..जाणून घ्या

As Sangli's water demand for irrigation decreased, the discharge in Koyna Dam decreased | सांगलीची सिंचनासाठी मागणी कमी; कोयनेतून विसर्ग घटला

सांगलीची सिंचनासाठी मागणी कमी; कोयनेतून विसर्ग घटला

सातारा : सांगली पाटबंधारे विभागाकडून सिंचनासाठी पाण्याची मागणी कमी झाल्याने कोयना धरणातील विसर्ग घटला आहे. सध्या ३१०० क्यूसेक पाणीसांगलीसाठी धरणातून सोडले जात आहे. हे पाणी कोयना नदीपात्रातून पुढे जात आहे. तर धरणात सध्या ४२ टीएमसी पाणीसाठा आहे.

राज्यात गेल्यावर्षी अपुरे पर्जन्यमान झाले. त्यामुळे दुष्काळाचे सावट सर्वत्र आहे. त्यातच सातारा जिल्ह्यातील कमी पाऊस पडला होता. तर कोयना धरण पाणलोट क्षेत्रातही अपुरे पर्जन्यमान होते. परिणामी कोयना धरण भरलेच नव्हते. धरणातील पाणीसाठा ९५ टीएमसीपर्यंतच पोहोचलेला. पण, याच कोयना धरणावर सातारा, सांगली, आणि सोलापूर जिल्ह्यातील सिंचन योजना अवलंबून आहेत. तसेच काही गावांची तहानही धरणातील पाण्यावरच भागते. तर धरणातील पाण्याची सर्वाधिक तरतूद ही सांगली जिल्ह्यासाठी आहे. यावर सांगलीतील प्रमुख तीन सिंचन योजना अवलंबून आहेत.

गेल्यावर्षी अपुरा पाऊस झाल्याने सांगली जिल्ह्यात दुष्काळी स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे तेथील सिंचनासाठी वारंवार पाणी सोडण्यात येत आहे. गेल्यावर्षीच्या नोव्हेंबर महिन्यापासून हे पाणी मागणीनुसार सोडले जाते. त्यातच मागील आठवड्यातच सांगली पाटबंधारे विभागाकडून सिंचनासाठी पाण्याची मागणी वाढली होती. त्यामुळे कोयना धरणाचे विमोचक द्वारमधील विसर्ग वाढविण्यात आला होता. सांगली जिल्ह्यातील सिंचनासाठी एकूण ३३०० क्यूसेक पाणी सोडण्यात येत होते. मात्र, गुरुवारी सांगली पाटबंधारे विभागाकडून सिंचनासाठी मागणी कमी झाली आहे. त्यामुळे विसर्ग कमी करण्यात आला आहे.

गुरूवारी दुपारपासून सांगली जिल्ह्यासाठी एकूण ३१०० क्यूसेक पाणी विसर्ग सुरू करण्यात आला आहे. विमोचक द्वारमधील विसर्ग १२०० वरुन १ हजार क्येसक करण्यात आलेला आहे. तर कोयना धरणाच्या पायथा वीजगृहाची दोन्ही युनीट सुरूच आहेत. त्यामूधन २१०० क्यूसेक वेगाने पाणी सोडले जात आहे. हे सर्व पाणी कोयना नदीपात्रातून पुढे जात आहे.

कोयना धरणात ४० टक्के पाणीसाठा..

कोयना धरणातील पाण्याची तरतूद ही ३१ मेपर्यंत असते. त्यानंतर नवीन तांत्रिक वर्ष सुरू होते. नवीन तांत्रिक वर्ष सुरू होण्यासाठी अजून ३६ दिवस बाकी आहेत. तोपर्यंत धरणातील उपलब्ध पाणीसाठ्याचा योग्य पध्दतीने वापर करावा लागणार आहे. तर गेल्यावर्षी २६ एप्रिलला धरणात ४०.६३ टीएमसी पाणीसाठा शिल्लक होता. त्यावेळीही सिंचन आणि पिण्याच्या पाण्यासाठी धरणातून विसर्ग सुरू करण्यात आलेला. आताही जवळपास गेल्यावर्षी एेवढाच पाणीसाठा शिल्लक असल्याचे दिसून येत आहे.

Web Title: As Sangli's water demand for irrigation decreased, the discharge in Koyna Dam decreased

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.