तासगावात ‘मोरया’चा जयघोष अन् भाविकांच्या भक्तिरसात ऐतिहासिक रथोत्सव, लाखो भाविकांची उपस्थिती

By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2023 06:40 PM2023-09-20T18:40:40+5:302023-09-20T18:40:56+5:30

दीड दिवसाच्या गणपतीचे विसर्जन, रथोत्सवातील भाविकांची गर्दी आणि उत्साह नजरेचे पारणे फेडणारा ठरला

the historic chariot festival was concluded with the chanting of Morya and the devotion of the devotees In Tasgaon sangli | तासगावात ‘मोरया’चा जयघोष अन् भाविकांच्या भक्तिरसात ऐतिहासिक रथोत्सव, लाखो भाविकांची उपस्थिती

तासगावात ‘मोरया’चा जयघोष अन् भाविकांच्या भक्तिरसात ऐतिहासिक रथोत्सव, लाखो भाविकांची उपस्थिती

googlenewsNext

दत्ता पाटील

तासगाव : ‘मंगलमूर्ती मोरयाऽऽ’च्या जयघाेषात निनादलेली तासगाव नगरी, गुलाल, पेढ्यांची उधळण आणि ढोल-ताशांचे लयबद्ध वादन अशा भक्तिमय वातावरणात तासगावचा ऐतिहासिक २४४ वा रथोत्सव सोहळा लाखो भाविकांच्या उपस्थितीत बुधवारी पार पडला. रथोत्सवातील भाविकांची गर्दी आणि उत्साह नजरेचे पारणे फेडणारा ठरला.

पंचायतनचे विश्वस्त श्रीमंत राजेंद्र पटवर्धन, डॉ. आदिती पटवर्धन यांच्या मार्गदर्शनाखाली दुपारी पटवर्धन राजवाड्यातून सर्व मानकऱ्यांसह छबिना बाहेर पडला. श्री गणपती मंदिरातील १२१ किलो वजनाची पंचधातूची ‘श्रीं’ची उत्सवमूर्ती पालखीतून मंदिराबाहेर रथापर्यंत आणण्यात आली. उत्सवमूर्ती रथामध्ये विराजमान झाल्यानंतर प्रथेप्रमाणे ‘श्रीं’ची आरती झाली. राष्ट्रगीत झाले आणि एक वाजता रथ ओढण्यासाठी सुरुवात झाली. 

लाखाे गणेशभक्त ‘माेरयाऽऽ’चा गजर करीत दोरखंड हाती घेऊन रथ ओढत हाेते. गुलाल, पेढे, खोबऱ्यांच्या उधळणीत रथाचा परिसर न्हाऊन निघाला. केळीचे खुंट, नारळाची तोरणे, पताका, फुलांच्या माळा, आदींनी रथ सजविण्यात आला होता. नागरिकांनी रस्त्याच्या दुतर्फा रांगोळी काढून रथाचे स्वागत केले. गणेशभक्तांना ठिकठिकाणी प्रसादाचे वाटप करण्यात येत होते. संपूर्ण रथयात्रेदरम्यान रथाभोवती मोठा पोलिस बंदोबस्त तैनात होता. प्रथेप्रमाणे श्री गणपती मंदिरापुढे असणाऱ्या श्री काशिविश्वेश्वराच्या मंदिरापर्यंत रथ ओढण्यात आला. श्री शंकर व श्री गणपती या पिता-पुत्रांची भेट झाली. श्रींची आरती झाली व रथाचा परतीचा प्रवास सुरू झाला. सायंकाळी दीड दिवसांच्या गणपतीचे विसर्जन करण्यात आले.

दरम्यान, सकाळपासून श्रींच्या दर्शनासाठी व रथावर नारळाचे तोरण बांधण्यासाठी गणेशभक्तांनी गर्दी केली होती. गणेश मंदिरात भक्तांना दर्शन घेता यावे, यासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली होती. रथयात्रेच्या मार्गावर तसेच गुरुवार पेठ, बसस्थानक चौकापर्यंतच्या रस्त्यावर यात्रा भरली होती.

गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई, आमदार सुमनताई पाटील, खासदार संजय पाटील, प्रभाकर पाटील, रोहित पाटील, पटवर्धन कुटुंबीय आणि मानकऱ्यांसह लाखो गणेशभक्तांनी रथोत्सवात सहभाग घेतला.

सोहळा पार पाडण्यासाठी प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवला होता. पोलिस उपअधीक्षक सचिन थोरबोले, निरीक्षक सोमनाथ वाघ, तहसीलदार रवींद्र रांजणे, मुख्याधिकारी पृथ्वीराज पाटील यांच्यासह अधिकाऱ्यांनी काटेकोर नियोजन केले.

Web Title: the historic chariot festival was concluded with the chanting of Morya and the devotion of the devotees In Tasgaon sangli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.