सांगलीतील अल्पवयीन मुलीवर अत्याचारप्रकरणी आरोपीस सश्रम कारावास

By घनशाम नवाथे | Published: April 29, 2024 05:42 PM2024-04-29T17:42:55+5:302024-04-29T17:43:26+5:30

सांगली : सांगलीतील अल्पवयीन मुलीचे अपहरण करून लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी आरोपी आसित रमजान मुजावर (वय २२, रा. रूक्मिणी मार्केट, ...

Rigorous imprisonment for the accused in the case of torture of a minor girl in Sangli | सांगलीतील अल्पवयीन मुलीवर अत्याचारप्रकरणी आरोपीस सश्रम कारावास

सांगलीतील अल्पवयीन मुलीवर अत्याचारप्रकरणी आरोपीस सश्रम कारावास

सांगली : सांगलीतील अल्पवयीन मुलीचे अपहरण करून लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी आरोपी आसित रमजान मुजावर (वय २२, रा. रूक्मिणी मार्केट, वानलेसवाडी, ता. मिरज) याला दहा वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश डी.एस. हातरोटे यांनी हा निकाल दिला. अतिरिक्त जिल्हा सरकारी वकील आरती देशपांडे-साटविलकर यांनी खटला चालवला.

अधिक माहिती अशी, विश्रामबाग पोलिस ठाणे हद्दीत राहणारी अल्पवयीन मुलगी हरवली होती. आईने विश्रामबाग पोलिस ठाण्यात ९ सप्टेंबर २०१९ रोजी मुलगी हरवल्याची तक्रार नोंदवली. त्यानंतर पोलिसांनी पिडितेचा शोध सुरू केला. तेव्हा ती सांगलीत एकेठिकाणी आढळली. आईने विश्वासात घेऊन विचारपूस केली. तेव्हा पिडितेने आरोपी आसीत याने पुण्याजवळील नारायणगाव येथे एका घरी नेऊन तिथे इच्छेविरूद्ध जबरदस्तीने शारिरीक संबंध ठेवल्याचे सांगितले. यानंतर पिडितेच्या आईने विश्रामबाग पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार आरोपी आसीत याच्याविरूद्ध ‘पोक्सो’ अंतर्गत गुन्हा दाखल केला.

तत्कालीन पोलिस उपअधीक्षक अशोक वीरकर यांनी या गुन्ह्याचा तपास केला. घटनास्थळाचा पंचनामा, पिडिता व तिच्या आईचा जबाब नोंदवला. इतर तपास टिपणे नोंदवून जिल्हा न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. सरकारतर्फे या खटल्यात ९ साक्षीदार तपासण्यात आले. अतिरिक्त जिल्हा सरकारी वकील आरती देशपांडे-साटविलकर यांनी शिक्षेच्या मुद्द्यावर जोरदार युक्तिवाद केला. आरोपी आसीत याला जास्तीत जास्त शिक्षा द्यावी. कोणतीही सहानुभूती दाखवू नये तसेच दंडाची रक्कम पिडितेला द्यावी अशी विनंती केली.

न्यायाधीश हातरोटे यांनी आरोपी आसीत याला दोषी ठरवून दहा वर्षे सश्रम कारावास आणि २५ हजार रूपये दंडाची शिक्षा सुनावली. न्यायालयीन कामकाजात पोलिस कर्मचारी सनी मोहिते, इम्रान महालकरी, पैरवी कक्षातील सुनिता आवळे, रेखा खोत आदींचे सहकार्य मिळाले.

Web Title: Rigorous imprisonment for the accused in the case of torture of a minor girl in Sangli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.