वीस वर्षांपासून लढा तरीही सांगली, आष्टा, संखला तालुक्यांचा दर्जा नाही; राज्यकर्त्यांचे दुर्लक्ष
By अशोक डोंबाळे | Published: April 25, 2024 05:15 PM2024-04-25T17:15:31+5:302024-04-25T17:16:53+5:30
प्रत्येक निवडणुकीत मुद्दा; पण, पुढे काहीच हालचाली नाहीत
अशोक डोंबाळे
सांगली : लोकसभा, विधानसभा निवडणुकांमध्ये संख, आष्टा आणि सांगली स्वतंत्र तालुक्यांचा मुद्दा चर्चेत असतो. पण, निवडणुका संपल्यानंतर पाच वर्षात खासदार, आमदारांकडून काहीच हालचाली होत नाहीत. नागरिकांच्या प्रश्नांकडे राज्यकर्ते दुर्लक्ष का करत आहेत, असा प्रश्न मतदारांमध्ये चर्चेत आला आहे. गेल्या वीस वर्षांपासून स्वतंत्र तालुक्यासाठी स्थानिक नागरिक लढा देत असूनही तालुक्यांचा दर्जा काही मिळाला नाही.
मिरज, वाळवा, जत तालुक्यांचे विभाजन करून सांगली, संख, आष्टा तालुक्यांची मागणी अनेक वर्षांपासून होत आहे. लोकांची प्रशासकीय गैरसोय टाळण्यासाठी तेथे तूर्त अपर तहसील कार्यालये सुरू करून शासनाने मध्यम मार्ग काढला होता. नव्या तालुक्यांचा निर्णय मात्र प्रत्यक्षात आला नाही. मिरज पश्चिम भागातील लोकांना विविध कामांसाठी मिरज येथे हेलपाटे मारावे लागत आहेत. त्यामुळे त्यांना गैरसोय सहन करावी लागत आहे. लोकसंख्या, क्षेत्रफळ यांचा विचार करता सांगली स्वतंत्र तालुका होणे गरजेचे आहे.
महायुती सरकारच्या काळात आमदार सुधीर गाडगीळ यांनी स्वतंत्र सांगली तालुक्याचा नव्याने प्रस्ताव दिला. त्याचा पाठपुरावा केला. गेल्या वीस वर्षांत स्वतंत्र तालुक्यांची नागरिकांची मागणी असूनही निर्मिती केली गेली नाही. त्याऐवजी अपर तहसील कार्यालय सुरू करून महसूल विभागाचा कारभार चालवला जातो.
वाळवा तालुका लोकसंख्येच्या तुलनेत मोठा आहे. वाळवा तालुक्यातून आष्टा स्वतंत्र तालुक्यांची मागणी असूनही याकडे माजी मंत्री जयंत पाटील यांनी फारसे लक्ष दिले नाही. यामुळे आष्टा परिसरातील नागरिकांना इस्लामपूरला कामकाजासाठी जावे लागत आहे.
जत तालुका लोकसंख्या आणि क्षेत्रफळाच्या दृष्टीनेही खूप मोठा आहे. जत पूर्व भागातील लोकांची गैरसोय होत असल्यामुळे संख आणि उमदी येथे स्वतंत्र तालुक्यांची मागणी होती. प्रशासनाने मध्यम मार्ग काढत संखला अपर तहसील मंजूर आहे. पण, स्वतंत्र तालुक्याचा प्रश्न आजही प्रलंबितच आहे. नागरिकांची मागणी असूनही त्याकडे खासदार, आमदारांनी का दुर्लक्ष केले, असाही प्रश्न सद्या मतदार उपस्थित करत आहेत.
कर्मचाऱ्यांची संख्या अपूर्ण
सांगली अपर तहसीलमध्ये मिरज तालुक्यातील सांगली, अंकली, इनामधामणी, सांगलीवाडी, हरिपूर, कर्नाळ, पद्माळे, कसबे डिग्रज, मौजे डिग्रज, समडोळी, तुंग, दुधगाव, सावळवाडी, माळवाडी, कवठेपिरान, मोळा कुंभोज, शेरीकवठे, बुधगाव, कुपवाड, वॉन्लेसवाडी, बामणोली, बिसूर, नांद्रे, वाजेगाव, कावजी खोतवाडी आणि माधवनगर या ३१ गावांचा समावेश आहे. अपर तहसीलदार, नायब तहसीलदार, अव्वल कारकून, लिपिक, टंकलेखक चार अशी पदे देण्यात आली आहेत. कर्मचाऱ्यांची संख्या कमी असल्यामुळे कारभार ठप्प झाला आहे.