सांगलीत महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये कलगीतुरा, एकमेकाला टोमणे 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 3, 2024 12:04 PM2024-05-03T12:04:58+5:302024-05-03T12:04:58+5:30

अपक्षांना मत देणे धोक्याचे : जयंत पाटील

Congress, Uddhav Sena, NCP Sharad Pawar group clarification on the conflict that arose in the Maha Vikas Aghadi over the Sangli Lok Sabha seat | सांगलीत महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये कलगीतुरा, एकमेकाला टोमणे 

छाया-नंदकिशोर वाघमारे

सांगली : सांगली लोकसभेच्या जागेवरून महाविकास आघाडीत निर्माण झालेल्या संघर्षावर काँग्रेस, उद्धवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्यांमध्ये चांगलाच कलगीतुरा रंगला होता. उमेदवारी मागील राजकारणात काहीही संबंध नसल्याचे सांगून दोषमुक्त होण्याचा राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी प्रयत्न केला. काँग्रेसचे कार्याध्यक्ष डॉ. विश्वजीत कदम यांनी व्यासपीठावर उमेदवारी वाटपाच्या राजकारणावर खंत व्यक्त केली. उद्धवसेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेची जागा कशी बरोबर आहे, हे ठणकावून सांगितले.

पहिल्या दिवशी मला जर समजलं असतं की सांगली विश्वजीत कदम यांच्यासाठी सोडायची आहे तर मीसुद्धा ही जागा सोडली असती. इथल्या भविष्याच्या आड शिवसेना अजिबात येणार नाही. आपल्या विचाराकडून हिसकावून घेतलेली जागा जिंकण्यासाठी आम्ही सांगलीत आलोय, असे ठाकरे यांनी ठणकावून सांगितले.

महाविकास आघाडीच्या नेत्यांनी एकमेकांवर शालूतून जोडे मारल्यानंतर आघाडीचा उमेदवार निवडून आणण्याच्या आणाभाका व्यासपीठावरून मतदारांना दिल्या. त्यानंतर व्यासपीठावरून नेते निघून जाताच, नेत्यांच्या भाषणांची कार्यकर्त्यांची चांगलीच चर्चा रंगली होती.

राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना दिला दम

महाविकास आघाडीचे काम एकमुखी सुरू आहे. सांगलीत मात्र तसं झालं नाही. जागावाटप प्रत्येक पक्षाचा निर्णय होता. भाजपला जर हरवायचे असेल तर आता लढाईची दिशा बदलून चालणार नाही. आपण ताकदीने चंद्रहार पाटील यांचेच काम करायला पाहिजे. लोक काय म्हणतात, यापेक्षा सदसद्विवेक बुद्धी जागृत ठेवून काम करायला पाहिजे. राष्ट्रवादीच्या माझ्या कार्यकर्त्यांनी काही गडबड केली तर त्यांना माझा शेवटचा रामराम समजावा, असा इशाराही जयंत पाटील यांनी दिला.

अपक्षांना मत देणे धोक्याचे : जयंत पाटील

मराठी माणसांनी उभारलेले पक्ष फोडण्याचे काम केलेल्या भाजपला त्यांची जागा दाखवण्याचा निर्णय घेतला आहे. नवनीत राणा यांना आम्ही निवडून दिले, त्या दुसऱ्या दिवशी भाजपमध्ये गेल्या. त्यामुळे अपक्षांना मत देणे धोक्याचे आहे, ते कधी कुठं जातील सांगता येत नाही. मी महाविकास आघाडीच्या जागा वाटपात कुठंही नव्हतो, पण वारंवार माझं नाव घेतलं जातं. माझा कुठंही संबंध नसल्याचे स्पष्टीकरण जयंत पाटील यांनी दिले.

स्टेजवर एक, खाली एक नको

कुणाची तरी इच्छा होती, ती मान्य झाली नाही, परंतु आता महाविकास आघाडीचा उमेदवार उभा आहे. आपण त्यांच्या पाठीशी ठामपणे रहावे, स्टेजवर एक आणि खाली एक अशी भूमिका घेतलेली चालणार नाही. राष्ट्रवादीतील लोकांनी शिवसेनेचे काम करायचे तरच पक्षात राहायचं... अन्यथा माझा त्यांना शेवटचा नमस्कार समजावा, असा इशारा जयंत पाटील यांनी दिला.

Web Title: Congress, Uddhav Sena, NCP Sharad Pawar group clarification on the conflict that arose in the Maha Vikas Aghadi over the Sangli Lok Sabha seat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.