Sangli: जमिनीच्या वादातून संघर्ष; मारहाणीत माजी सरपंचाचा मृत्यू, पाच जणांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा
By घनशाम नवाथे | Published: January 18, 2024 01:54 PM2024-01-18T13:54:16+5:302024-01-18T13:54:29+5:30
सांगली : कसबे डिग्रज (ता. मिरज) जमिनीच्या वादातून झालेल्या मारहाण वेळी राष्ट्रवादीचे माजी सरपंच अण्णासाहेब दत्तू सायमोते (वय ५८, ...
सांगली : कसबे डिग्रज (ता. मिरज) जमिनीच्या वादातून झालेल्या मारहाण वेळी राष्ट्रवादीचे माजी सरपंच अण्णासाहेब दत्तू सायमोते (वय ५८, आपटे मळा) यांचा मृत्यू झाला. वैद्यकीय तपासणीत त्यांचा मारहाण वेळी हृदयविकाराने मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले.
याप्रकरणी संशयित सुनील चव्हाण, संजय चव्हाण, विनायक चव्हाण, विशाल चव्हाण, विक्रम चव्हाण यांच्याविरूद्ध सांगली ग्रामीण पोलिस ठाण्यात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी पाच जणांना ताब्यात घेतले आहे. मृत सायमोते यांचा मुलगा अविनाश याने फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दानोळी (ता. हातकणंगले) येथील शुभम चव्हाण यांची गावातील जमीन संशयित संजय चव्हाण हा करत होता. एक वर्षापूर्वीच शुभम यानी सदरची २७ गुंठे जमीन विक्री करणार असल्याबद्दल मृत सायमोते यांना सांगितले होते. सायमोते यांनी संशयित संजय याला तो कसत असलेली जमीन विकत घेण्याचा प्रस्ताव आल्याचे सांगितले होते.
त्यानंतर सायमोते यांनी वकील मार्फत जमीन कसणाऱ्या संजय याला व त्याच्या भावांना जमीन खरेदी करणार असून हरकत असल्यास सांगण्याबाबत नोटीस पाठवली. नोटिसीला त्यांनी कोणतेही उत्तर दिले नाही. त्यानंतर २७ डिसेंबर रोजी खरेदीपत्र करून सायमोते यांनी जमीन खरेदी केली. त्यानंतर संशयित संजय व नातेवाइकांनी सातबारावर नोंद करण्यास तलाठी कार्यालयात हरकत घेतली होती.
या प्रकारानंतर सायमोते हे सकाळी ९.३० वाजता बसस्थानक चौकात सुपर टेलर दुकानात कपडे घेण्यासाठी गेले होते. तेव्हा संशयित पाचजण तेथे आले होते. त्यांनी सायमोते यांना शिवीगाळ करत धक्काबुक्की केली. तसेच हाताने, बुक्क्यांनी मारहाण केली. काहीजणांनी त्यांना सोडवण्याचा प्रयत्न केला. तेवढ्यात सायमोते यांचा मुलगा अविनाश तेथे आला. वडिलांना सोडविताना त्यालाही मारहाण केली.
संशयित मारहाण करत असताना सायमोते हे खाली कोसळून बेशुद्ध पडले. तेव्हा मुलगा अविनाश, चुलतभाऊ सचिन सायमोतेे, नवनाथ सायमोते आदींनी त्यांना दुचाकीवरून गावात खासगी दवाखान्यात नेले. त्यांनी सांगलीत नेण्यास सांगितले. सांगलीत खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल केले. तेथून सिव्हिलमध्ये नेण्यास सांगितले. सिव्हिलमध्ये नेल्यानंतर ते मृत झाल्याचे सांगितले. शवविच्छेदनामध्ये सायमोते यांचा हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाल्याचे सांगितले.
दरम्यान अविनाश सायमोते याने दिलेल्या फिर्यादीवरून व वैद्यकीय अहवालानुसार संशयित संजय चव्हाणसह पाच जणांविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला. त्यांना ताब्यात घेतले. सहायक पोलिस निरीक्षक सुशांत पाटील तपास करत आहेत.
सिव्हिलमध्ये दोन गटात धक्काबुक्की
सायमोते यांना मारहाण केल्यानंतर संशयित ग्रामीण पोलिस ठाण्यात फिर्याद देण्यास आले होते. तेथून ते सिव्हिल हॉस्पिटलमध्ये गेले. तेथे सायमोते यांना आणल्यानंतर दोन गटात शिवीगाळ होऊन धक्काबुक्कीचाही प्रकार घडला. त्यामुळे सिव्हिल परिसरात गोंधळ उडाला होता.
गावात तणावाचे वातावरण
सायमोते यांचा मारहाण वेळी मृत्यू झाल्याचे समजताच गावात सायमोते यांचे नातेवाईक जमले होते. त्यांनी खुनाचा गुन्हा दाखल केल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नाही असा पवित्रा घेतला. गावात तणावाचे वातावरण होते. उपाधीक्षक अण्णासाहेब जाधव, ग्रामीणचे प्रभारी निरीक्षक अभिजीत देशमुख व पथकाने गावात भेट दिली. दोन्ही गटाशी चर्चा करून शांततेचे आवाहन केले. सायंकाळी उशिरा अंत्यसंस्कार करण्यात आले.