सांगली मार्केट यार्डात रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ता?, महापालिका-बाजार समितीच्या वादात व्यापारी, शेतकऱ्यांचे हाल

By अशोक डोंबाळे | Published: May 18, 2024 06:21 PM2024-05-18T18:21:56+5:302024-05-18T18:22:20+5:30

पाच राज्यांतून शेतमालाची आवक, रस्त्याची दयनीय स्थिती

Bad condition of road in Sangli Market Yard, Plight of traders, farmers in dispute between Municipal Corporation and Market Committee | सांगली मार्केट यार्डात रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ता?, महापालिका-बाजार समितीच्या वादात व्यापारी, शेतकऱ्यांचे हाल

सांगली मार्केट यार्डात रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ता?, महापालिका-बाजार समितीच्या वादात व्यापारी, शेतकऱ्यांचे हाल

सांगली : सांगली मार्केड यार्डातील रस्ता पावसाळ्यापूर्वीच खराब झाला आहे. रस्त्यात खड्डा की खड्ड्यात रस्ता, अशी रस्त्याची दयनीय स्थिती झाली आहे. खड्ड्यांचे अडथळे पार करताना वाहन चालकांची दैना होत असून, त्यात वाहतूक कोंडीची भर पडत आहे. अनेक ठिकाणी रस्त्यावरील डांबर निघून गेल्याने खडी बाहेर आल्याने दुचाकीस्वार घसरून पडण्याचे प्रकार वाढले आहेत. दरम्यान, रस्ता दुरुस्ती महापालिका आणि बाजार समितीच्या वादात थांबल्याची माहिती पुढे आली आहे.

सांगली मार्केट यार्डातील मुख्य रस्ते, पेठांमधील अंतर्गत रस्ते, असे कोणतेही रस्ते यास अपवाद राहिलेले नाहीत. खड्ड्यांमुळे पावसाळ्यात रस्त्यांवर पाणी साचत आहे. सांगली मार्केट यार्डाच्या दोन्ही प्रवेशद्वारांतच शेतकरी, व्यापाऱ्यांचे खड्ड्यांनी स्वागत होत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून या मुख्य रस्त्यावर मोठे खड्डे पडले असून, ते भरण्याचीही महापालिका आणि सांगली बाजार समिती तसदी घेत नाही. व्यापाऱ्यांनी बाजार समितीकडे तक्रार करूनही त्याकडे लक्ष दिले जात नाही. 

बाजार समिती प्रशासनाच्या माहितीनुसार सांगली मार्केट यार्डातून जाणारा मुख्य रस्ता महापालिकेकडे आहे. त्यामुळे तो रस्ता महापालिका प्रशासनाने दुरुस्त करून देण्याची गरज आहे; पण यासाठी महापालिकेकडे पाठपुरावाही होत नाही. यामुळे गेल्या वर्षभरापासून सांगली मार्केट यार्डातील मुख्य रस्त्यावरील खड्डे तसेच आहेत. मुख्य रस्त्याबरोबरच पेठेतील रस्त्यांवरही खड्डेच खड्डे आहेत. या रस्त्यांनाही दहा वर्षांत डांबर मिळाले नाही. एवढेच काय, तर सांगली बाजार समितीच्या मुख्य इमारतीसमोरील रस्त्यावरही खड्डेच आहेत. याकडे सांगली बाजार समिती प्रशासनाने दुर्लक्ष का केले आहे, असा प्रश्न व्यापाऱ्यांनी उपस्थित केला आहे.

रस्ते करणार; पण पावसाळ्यानंतर : महेश चव्हाण

सांगली मार्केट यार्डातील मुख्य रस्ता महापालिकेच्या ताब्यात आहे. या रस्त्याची दुरुस्ती करण्यासाठी महापालिका प्रशासनासोबत पत्रव्यवहार केला आहे. सांगली मार्केट यार्डातील अंतर्गत रस्त्याच्या कामाचे अंदाजपत्रक तयार केले आहे; पण पावसाळा संपल्याशिवाय रस्त्याचे काम करता येणार नाही, म्हणून पावसाळ्यानंतर लगेच रस्त्याचे काम करणार आहे, अशी प्रतिक्रिया सांगली बाजार समितीचे सचिव महेश चव्हाण यांनी दिली.

पाच राज्यांतून शेतमालाची आवक

सांगली मार्केट यार्डात आंध्र प्रदेश, तेलंगणा, मध्य प्रदेश, कर्नाटक, गुजरात या पाच राज्यांतून मालाच्या खरेदी- विक्रीचे व्यवहार दररोज होत आहेत. शेकडो अवजड वाहने रोज येतात आणि जातात. या वाहन चालकांकडूनही रस्त्यावरील खड्ड्यांबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. तरीही बाजार समिती प्रशासनाला जाग येत नाही.

Web Title: Bad condition of road in Sangli Market Yard, Plight of traders, farmers in dispute between Municipal Corporation and Market Committee

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.