सांगलीतील व्यापारी पिता-पुत्राकडून चार कोटींची फसवणूक, मसाले व्यापाऱ्यात गुंतवणुकीच्या आमिषाने गंडा

By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2024 06:24 PM2024-04-18T18:24:23+5:302024-04-18T18:24:40+5:30

बोरगाव : ताकारी (ता. वाळवा) येथील व्यापारी तय्यूब रज्जाक मोटलाणी (वय ५५) व इरफान तय्यूब मोटलाणी (२२, रा. ताकारी, ...

4 Crore fraud by business father and son in Sangli, Lure of Investment in Spice Traders | सांगलीतील व्यापारी पिता-पुत्राकडून चार कोटींची फसवणूक, मसाले व्यापाऱ्यात गुंतवणुकीच्या आमिषाने गंडा

सांगलीतील व्यापारी पिता-पुत्राकडून चार कोटींची फसवणूक, मसाले व्यापाऱ्यात गुंतवणुकीच्या आमिषाने गंडा

बोरगाव : ताकारी (ता. वाळवा) येथील व्यापारी तय्यूब रज्जाक मोटलाणी (वय ५५) व इरफान तय्यूब मोटलाणी (२२, रा. ताकारी, ता. वाळवा) या पिता-पुत्रांनी होलसेल किराणा व्यापारात गुंतवणुकीवर मोठा नफा मिळवून देण्याच्या आमिषाने ४ कोटी ३ लाख ४० हजारांची फसवणूक करून पोबारा केल्याचा प्रकार समाेर आला आहे. याबाबत सुशांत माणिकराव कोळेकर (रा. रेठरेहरणाक्ष) यांनी इस्लामपूर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

मोटलाणी पिता-पुत्र ताकारी येथील होलसेल व रिटेल व्यापारी आहेत. त्यांनी रेठरेहरणाक्ष येथील सुशांत कोळेकर यांना ‘होलसेल किराणा व्यापारात गुंतवणूक कर यात भरपूर पैसा भेटतो’ असे सांगून जाळ्यात ओढले. एस. के. ट्रेडर्स नावाची कंपनी काढली. या कंपनीद्वारे वेलदोडा, जिरे, मोहरी या मसाल्यांची खरेदी करण्यासाठी काेळेकर यांनी रोख १५ लाख ९० हजार रुपये तय्यूब याच्याकडे दिले. यावर न थांबता त्याचा मुलगा इरफान याने बजाज फायनान्समधून कोळेकर यांच्या नावे कर्ज घेतले. आरटीजीएस करून ती रक्कम स्वत:च्या खात्यावर जमा करून घेतली. त्यातील दोन लाख थकबाकी केली.

मोटलाणी पिता-पुत्रांनी ‘व्यापारासाठी पैशांची गरज आहे’ असे सांगून ३० जून २३ राेजी कोळेकर यांच्या नावे मोहरी मसाल्यावर सांगली अर्बन बँकेच्या इस्लामपूर शाखेतून १२ लाखांचे माल तारण कर्ज काढले. ५ मार्च २४ रोजी जिरे या मालावर ७ लाख ५० हजार मंजूर करून घेतले. १३ मार्च रोजी आयडीबीआय बँकेच्या तळसंदे शाखेतून जिरे मालावर ४५ लाख रुपये मंजूर करून घेतले. तिन्ही प्रकरणांतील रक्कम आरटीजीएसच्या माध्यमातून स्वत:च्या खात्यावर जमा करून घेतली. रोख व कर्जाऊ रक्कम मिळून ८२ लाख ४० हजारांची फसवणूक केली.

याशिवाय इतर लोकांच्या नावे माल तारण कर्ज २ कोटी २१ लाख ३४ हजार तर व्यापाराकरिता ९९ लाख ६६ हजार ४७ रुपये उचलले आहे, अशी एकूण ४ कोटी ३ लाख ४० हजारांची फसवणूक केली. माेटलाणी पिता-पुत्र सध्या गायब आहेत. याबाबत इस्लामपूर पोलिसांत गुन्हा नोंद झाला असून, अधिक तपास सहायक पोलिस निरीक्षक हरिश्चंद्र गावडे करीत आहेत.

Web Title: 4 Crore fraud by business father and son in Sangli, Lure of Investment in Spice Traders

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.