Looop Lapeta Review: हसून हसून कंटाळा आणणारा चित्रपट?; तापसी अन् ताहिरचा 'लूप लपेटा'

By ऑनलाइन लोकमत | Published: February 4, 2022 03:32 PM2022-02-04T15:32:05+5:302022-02-04T15:52:40+5:30

Looop Lapeta Review: नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झालेला हा चित्रपट सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. प्रेक्षकांना गुंतवून ठेवणारा हा चित्रपट २ तास ११ मिनिटांचा आहे.

looop lapeta review taapsee pannu tahir raj bhasin starrer movie | Looop Lapeta Review: हसून हसून कंटाळा आणणारा चित्रपट?; तापसी अन् ताहिरचा 'लूप लपेटा'

Looop Lapeta Review: हसून हसून कंटाळा आणणारा चित्रपट?; तापसी अन् ताहिरचा 'लूप लपेटा'

googlenewsNext
Release Date: February 04,2022Language: हिंदी
Cast: तापसी पन्नू, ताहिर राज भसीन, राजेंद्र चावला,दिब्येंदु भट्टाचार्य,श्रेया धन्वंतरी
Producer: तनुज गर्ग, अतुल कसबेकर,आयुष माहेश्वरीDirector: आकाश भाटिया
Duration: 2h 11mGenre:
लोकमत रेटिंग्स

'मुल्क' असो नाही तर 'नाम शबाना' कोणतीही भूमिका चपखलपणे पार पाडणारी अभिनेत्री म्हणजे तापसी पन्नू. दाक्षिणात्य कलाविश्वातून आलेल्या या अभिनेत्रीने बॉलिवूडमध्ये आपली हक्काची जागा निर्माण केली आणि हळूहळू लोकप्रिय अभिनेत्रींच्या यादीत वरचं स्थान मिळवलं. तापसीच्या 'रश्मी रॉकेट' या चित्रपटाची चर्चा सुरु असतांनाच तिचा बहुप्रतिक्षीत ठरलेला 'लूप लपेटा' (Looop Lapeta) हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला. नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झालेला हा चित्रपट सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. प्रेक्षकांना गुंतवून ठेवणारा हा चित्रपट २ तास ११ मिनिटांचा आहे. मात्र, या चित्रपटात तापसी तिच्या प्रियकराला वाचवण्यासाठी कशी एक सोडून एक अशा दुसऱ्या डावांमध्ये फसत जाते हे सांगण्यात आलं आहे.

कशी आहे नेमकी चित्रपटाची कथा?

'लूप लपेटा' या चित्रपटाची कथा सवी म्हणजेच सवीना बोरकर (तापसी पन्नू) हिच्याभोवती फिरताना दिसत आहे. सवी एक एथलीट असून तिला धावण्याच्या शर्यतीत सुवर्णपदक जिंकायचं आहे. जिंकायचं नव्हे ते तिचं स्वप्न आहे. परंतु, एका अपघातात तिच्या गुडघ्यांना मोठी इजा होते आणि तिचं स्वप्न कायमस्वरुपी स्वप्न म्हणूनच राहतं. या दुर्घटनेनंतर सवीचं पूर्ण आयुष्य बदलून जातं. एकीकडे स्वप्न मोडल्याचं दु:ख असतानाच तिची भेट रुग्णालयात सत्यासोबत होते. सत्या म्हणजेच सत्यजीत (ताहिर राज भसीन) ज्याला आयुष्यात खूप पैसे कमवून मोठं व्हायचं असतं. त्यामुळे झटपट पैसे कमवायच्या नादात तो जुगार खेळत असतो. सवीसोबत त्याची मैत्री झाल्यानंतर सवीला आपल्यासोबत घेऊन एक दिवस Stockholm वरुन Helsinki फेरी राइडसाठी घेऊन जाण्याची त्याची इच्छा असते. परंतु, त्याच्याकडे तितके पैसेही नसतात आणि नशीबही त्याला फारशी साथ देत नाही. त्यातच सत्यावर एक मोठं संकट ओढावलं असतं. या संकटातून त्याला बाहेर पडण्यासाठी कोणत्याही परिस्थितीत ५० मिनिटांमध्ये ५० लाख रुपयांची तजवीज करायची असते.  म्हणूनच तो सवीची या कामात मदत मागतो आणि त्यांचं आयुष्य लूप लपेटामध्ये अडकून जातं. विशेष म्हणजे ५० लाख जमवण्यासाठी ते कशी धडपड करतात, त्यांना कोणत्या अडचणी येतात या साऱ्याचा प्रवास या चित्रपटात दाखवण्यात आला आहे.

अभिनय आणि दिग्दर्शन

प्रत्येक भूमिकेला न्याय देणाऱ्या तापसीने या चित्रपटातही तिच्या भूमिकेला पुरेपूर न्याय दिला आहे. तर छिछोरेमध्ये झळकलेल्या ताहिरनेदेखील या चित्रपटातून त्याच्या अभिनयाची दुसरी बाजू प्रेक्षकांना दाखवली आहे. त्यामुळे दोन्ही कलाकारांनी त्यांच्या अभिनयामुळे प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं आहे. दिग्दर्शक आकाश भाटिया यांनी उत्तमरित्या दिग्दर्शन केल्यामुळे प्रेक्षक मूळ कथेशी जोडला जातो. परंतु, वारंवार अनावश्यक विनोद असल्यामुळे काही ठराविक काळासाठी चित्रपट कंटाळवाणाही वाटतो.

अती विनोदामुळे कथा होते कंटाळवाणी

लूप लपेटा या चित्रपटात तापसी आणि ताहिर राज भसीन ही जोडी मुख्य भूमिकेत झळकली असून दोघा कलाकारांनी आपल्या भूमिकेला न्याय देण्याचा पुरेपूर प्रयत्न केला आहे. सोबतच दिब्येंदु भट्टाचार्य, राजेंद्र चावला, श्रेया धन्वंतरी, के सी शंकर, माणिक पपनेजा आणि भूपेश बंदेकर या कलाकारांनीही चित्रपटाची रंगत वाढवली आहे. परंतु, अनेक ठिकाणी अनावश्यकपणे विनोदाचा भरणा केल्यामुळे एका ठराविक वेळेनंतर चित्रपट कंटाळवाणा होऊ लागतो. अनेक सीनमध्ये काही कलाकार एकमेकांचे वाक्य पुन्हा पुन्हा रिपिट करत आहेत जे पाहून प्रेक्षकांमध्ये नाराजीचा सूर उमटल्याचं पाहायला मिळतं.

चित्रपट पाहावा का?

नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झालेला हा चित्रपट एखाद वेळी पाहण्यास काहीच अडचण नाही. परंतु, या चित्रपटात तुम्हाला खूप काही मजेदार पाहायला मिळेल याची अपेक्षा करु नका. तापसी पन्नू आणि ताहिर यांच्या अभिनयासाठी हा चित्रपट नक्कीच पाहता येईल. 

Web Title: looop lapeta review taapsee pannu tahir raj bhasin starrer movie

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.