खूनप्रकरणातील संशयिताचा जामीन फेटाळला, सहा महिने न्यायालयीन कोठडीतच

By मनोज मुळ्ये | Published: May 1, 2024 05:03 PM2024-05-01T17:03:23+5:302024-05-01T17:05:10+5:30

वैशाली चंद्रकांत रांबाडे हिचा जुलै २०२३ मध्ये खून झाला होता आणि या प्रकरणी तिचा प्रियकर राजेंद्र गोविंद गुरव याला ऑक्टोबरमध्ये अटक झाली आहे.

The suspect in the murder case was denied bail and remained in judicial custody for six months | खूनप्रकरणातील संशयिताचा जामीन फेटाळला, सहा महिने न्यायालयीन कोठडीतच

खूनप्रकरणातील संशयिताचा जामीन फेटाळला, सहा महिने न्यायालयीन कोठडीतच

लांजा : विवाहितेच्या खून प्रकरणी अटकेत असलेल्या संशयित आरोपी प्रियकराचा जामीन अर्ज फेटाळण्यात आला आहे. तालुक्यातील कोंड्ये रांबाडेवाडी येथे ही घटना घडली होती. यात वैशाली चंद्रकांत रांबाडे हिचा जुलै २०२३ मध्ये खून झाला होता आणि या प्रकरणी तिचा प्रियकर राजेंद्र गोविंद गुरव याला ऑक्टोबरमध्ये अटक झाली आहे.

लांजा तालुक्यातील कोंड्ये रांबाडेवाडी येथील वैशाली रांबाडे खून प्रकरणाचा उलगडा अडीच महिन्यांनंतर झाला होता. वैशाली चंद्रकांत रांबाडे (४८ वर्षे) ही शनिवार दि. २९ जुलै २०२३ रोजी कुवे येथे डॉक्टरकडे जाते, असे सांगून घराबाहेर पडली होती. मात्र ती घरी न परतल्याने तिचे पती चंद्रकांत रांबाडे हे मुंबईहून गावी आले. त्यानंतर त्यांनी रविवार दि. ३० जुलै रोजी लांजा पोलिस स्थानकात वैशाली बेपत्ता झाल्याची फिर्याद दाखल केली होती. लांजा पोलिस तिचा शोध घेत होते. बराच काळ शोध न लागल्याने तिच्या पतीने ११ ऑक्टोबर रोजी वाडीतीलच राजेंद्र गुरव याच्यावर संशय घेत लांजा पोलिसांकडे फिर्याद दाखल केली. १२ ऑक्टोबरला पोलिसांनी राजेंद्रला अटक केली आणि या प्रकरणाचा गुंता सुटला.

शनिवार दि. २९ जुलै रोजी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास वैशालीला कुवे येथील जंगलमय भागात नेऊन राजेंद्रने तिचा खून केल्याचे पोलिस तपासात उघड झाले.
राजेंद्र गुरव आणि वैशाली रांबाडे यांच्यात प्रेमसंबंध होते. त्यातून वैशालीने राजेंद्र याच्याकडे वारंवार पैशासाठी तगादा लावला होता. या त्रासाला कंटाळूनच राजेंद्रने वैशाली हिचा काटा काढल्याचे तपासात पुढे आले.

दि. १२ ऑक्टोबर रोजी त्याला लांजा न्यायालयासमोर उभे केले असता न्यायालयाने त्याला ८ दिवसांची पोलिस कोठडी ठोठावली होती. याप्रकरणी आतापर्यंत  संशयिय आरोपी राजेंद्र  न्यायालयीन कोठडीत आहे. त्याने जामीन मिळण्यासाठी जिल्हा सत्र न्यायाल्यात अर्ज केला होता. यावर दोन्ही बाजूने जोरदार युक्तिवाद करण्यात आला. फिर्यादी चंद्रकांत रांबाडे यांच्यावतीने ॲड. अमित आठवले यांनी न्यायालयात जोरदार बाजू मांडली. न्यायालयाने राजेंद्र गुरव यांचा जामीन अर्ज फेटाळून लावला आहे.

Web Title: The suspect in the murder case was denied bail and remained in judicial custody for six months

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.