महाविकास आघाडीच्या सभेत व्यासपीठावरच नाराजी नाट्य; अनंत गिते यांचे भाषण भास्कर जाधव यांनी थांबवले
By मनोज मुळ्ये | Published: April 25, 2024 09:45 PM2024-04-25T21:45:44+5:302024-04-25T21:49:10+5:30
या विषयाची जोरदार चर्चा झाली. केवळ रत्नागिरी जिल्हाच नाही तर रायगड जिल्ह्यातही हा विषय वाऱ्यासारखा पसरला.
लोकमत न्यूज नेटवर्क, गुहागर : महाविकास आघाडीचे उमेदवार अनंत गिते आणि आमदार भास्कर जाधव यांचे छोट्याशा विषयावरून नाराजी नाट्य झाल्याचा प्रकार गुहागर तालुक्यातील पालपेणे येथे झाला. अनंत गीते यांचे भाषण भास्कर जाधव यांनी मध्येच थांबवल्याने गिते नाराज झाले आणि ज्या मुद्यासाठी भास्कर जाधव यांनी भाषण थांबवले तो मुद्दा गिते यांनी पुढे सुरूच ठेवल्याने भास्कर जाधवही नाराज झाले. त्यामुळे या विषयाची जोरदार चर्चा झाली. केवळ रत्नागिरी जिल्हाच नाही तर रायगड जिल्ह्यातही हा विषय वाऱ्यासारखा पसरला.
अंजनवेल गटाची महाविकास आघाडीची सभा पालपेणे भवानी सभागृहात सुरू होती. अनंत गिते यांनी भाषणाची सुरुवात करतानाच, मागील लोकसभा निवडणुकीत गुहागर विधानसभा मतदारसंघात मी भास्कर जाधव यांच्याविरोधात लढलो, असे उद्गार काढले. हे वाक्य ऐकताच ‘सॉरी सॉरी गिते साहेब’ असे म्हणत आमदार जाधव उठून उभे राहिले. मला असे वाटते की हे बोलणं आता टाळलं पाहिजे. या वाक्याचा वेगळा अर्थ लावून प्रचार केला जातोय. मी राष्ट्रवादीत होतो, म्हणून तटकरे यांच्या बाजूने होतो. मी पक्षात राहून कधीही गद्दारी केलेली नाही, असे गिते यांना सांगून आमदार जाधव खाली बसले.
तरीही माझे पुढचे वाक्य आपण ऐकावे, असे गिते यांनी सांगितल्यावर आपल्या प्रत्येक सभेतील भाषणे मी ऐकली आहेत, असे सांगत आमदार जाधव यांनी मान फिरवत नाराजी व्यक्त केली. यावेळी अनंत गिते यांचाही चेहरा पडला. परंतु, प्रचार सभा असल्याने त्यांनी विषय बदलत भाषणाला सुरुवात केली.
या सभेला जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विक्रांत जाधव, जिल्हाप्रमुख सचिन कदम, तालुकाप्रमुख सचिन बाईत, काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष इक्बाल घारे, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे तालुकाध्यक्ष पद्माकर आरेकर उपस्थित होते.
भोजनालाही थांबले नाहीत
ही सभा संपल्यावर आमदार जाधव यांनी अनंत गिते आणि त्यांच्यासोबत असलेले जिल्हाप्रमुख सचिन कदम, नित्यानंद भागवत यांना जेवायला येण्याचा निरोप दिला. मात्र, अनंत गिते यांनी वेळणेश्वरच्या सभेसाठी पुढे जातो, असा उलटा निरोप दिला आणि ते जेवण्यासाठी थांबले नाहीत.