महाराष्ट्राची सामाजिक ऐक्याची, सामाजिक न्यायाची उज्ज्वल परंपरा अखंड ठेवू या - उदय सामंत

By अरुण आडिवरेकर | Published: May 1, 2024 10:28 AM2024-05-01T10:28:25+5:302024-05-01T10:28:52+5:30

महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेसाठी अनेकांना हौतात्म्य पत्कारावे लागले. या शूर हुतात्म्यांना आजच्या दिनी अभिवादन करणे आपणा सर्वांचे आद्य कर्तव्य आहे.

Let's keep Maharashtra's bright tradition of social unity, social justice intact - Uday Samant | महाराष्ट्राची सामाजिक ऐक्याची, सामाजिक न्यायाची उज्ज्वल परंपरा अखंड ठेवू या - उदय सामंत

महाराष्ट्राची सामाजिक ऐक्याची, सामाजिक न्यायाची उज्ज्वल परंपरा अखंड ठेवू या - उदय सामंत

रत्नागिरी : आपल्याकडे जाती, धर्म, सण, उत्सव, संस्कृती, परंपरा यांच्यात वैविध्य असले, तरी त्यात सुंदर असे एकात्मतेचे सूत्र नेहमीच ठळकपणे अधोरेखित झाले आहे. आपल्यातील हाच गोडवा, प्रेम, आपुलकी, स्नेह पुढील काळातही जपू या. महाराष्ट्राची सामाजिक ऐक्याची, सामाजिक न्यायाची उज्ज्वल परंपरा अखंड ठेवू या, अशा शब्दांत पालकमंत्री उदय सामंत यांनी महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने जिल्हावासीयांना शुभेच्छा दिल्या.

येथील पोलिस परेड ग्राऊंडवर ध्वजारोहणाचा मुख्य शासकीय सोहळा पालकमंत्री सामंत यांच्या हस्ते झाला. यावेळी जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्ती किरण पुजार, पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, अपर जिल्हाधिकारी शंकर बर्गे, अतिरिक्त पोलिस अधीक्षक जयश्री गायकवाड, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, उपजिल्हाधिकारी सर्वसाधारण शुभांगी साठे, जिल्हा पुनर्वसन अधिकारी मारुती बोरकर, उपजिल्हा निवडणूक अधिकारी राहूल गायकवाड, जिल्हा नियोजन अधिकारी सत्यविनायक मुळे, प्रांताधिकारी जीवन देसाई, तहसीलदार राजाराम म्हात्रे  उपस्थित होते.

मंत्री सामंत पुढे म्हणाले की, आपल्या महाराष्ट्र राज्य स्थापनेचा ६५ वा दिन साजरा होत आहे. छत्रपती शिवाजी महाराज, लोकराजा राजर्षी शाहू महाराज, महात्मा जोतिबा फुले, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, लोकमान्य बाळ गंगाधर टिळक, स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी लोक कल्याणाच्या घालून दिलेल्या मार्गदर्शक तत्वानुसारच महाराष्ट्राची गौरवशाली आणि प्रतिभाशाली वाटचाल सुरु आहे. महाराष्ट्राला संतांची थोर परंपरा लाभली आहे. महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेसाठी अनेकांना हौतात्म्य पत्कारावे लागले. या शूर हुतात्म्यांना आजच्या दिनी अभिवादन करणे आपणा सर्वांचे आद्य कर्तव्य आहे.

महाराष्ट्राचे शिल्पकार आणि पाहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी महाराष्ट्र राज्य स्थापनेचा मंगल कलश आणण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. हे जग कष्टकरी कामगारांच्या श्रमावर चालतं, हे सप्रमाण सिध्द करणाऱ्या माझ्या कामगार बांधवांना आजच्या कामगारदिनी मी मनापासून शुभेच्छा देतो. ध्वजारोहणानंतर मंत्री सामंत यांनी परेड निरीक्षण केले. परेड कमांडर पोलिस निरीक्षक रमेश निकम यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांनी संचलन केले. यामध्ये विविध पोलिस पथकांसह बँड पथक, श्वान पथक, अग्निशमन दल आदींचा समावेश होता.

Web Title: Let's keep Maharashtra's bright tradition of social unity, social justice intact - Uday Samant

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.