जेएनपीए सेझमधील चॉकलेट कंपनीच्या गोदामाला भीषण आग; कोटींवधींचे साहित्य जळून खाक

By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2023 04:12 PM2023-10-11T16:12:44+5:302023-10-11T16:13:48+5:30

अग्नीशमन दलाच्या जवानांनी दोन तासांच्या शर्थीच्या प्रयत्नांनंतर आग आटोक्यात आली होती.

Massive fire breaks out at chocolate company's godown in JNPA SEZ; Millions of materials were burnt | जेएनपीए सेझमधील चॉकलेट कंपनीच्या गोदामाला भीषण आग; कोटींवधींचे साहित्य जळून खाक

जेएनपीए सेझमधील चॉकलेट कंपनीच्या गोदामाला भीषण आग; कोटींवधींचे साहित्य जळून खाक

- मधुकर ठाकूर

उरण : जेएनपीए  सेझमधील एका चॉकलेट कंपनीच्या गोदामाला बुधवारी (११) सकाळी लागलेल्या भीषण आगीमुळे कोट्यावधींचे साहित्य जळून खाक झाले आहे. जेएनपीए सेझमध्ये विविध प्रकारच्या कंपन्या उभारण्यात येत आहेत.या सेझमध्ये आर.के.स्वीट प्रा.लि. ही कंपनी वर्षांपासून सुरू झाली आहे.या कंपनीतून कॅडबरी चॉकलेट प्रदेशात मोठ्या प्रमाणावर निर्यात केली जातात. सोनारी गावासमोर आणि चांदणी चौकाच्या रोडला लागून असलेल्या सेझमधील आर.के.स्वीट कंपनीच्या गोदामालाच सकाळी १० वाजताच्या सुमारास भीषण आग लागली. या कंपनीच्या गोदामात  पुठ्ठे, रबर ,पॅकिगसाठी लागणारे रॅपरचे कागद, प्लास्टिक , निर्यातीसाठी असलेला चॉकलेट साठा साठवून ठेवण्यात आला होता.

मोठ्या प्रमाणावर साठवून ठेवण्यात आलेल्या साहित्याने पेट घेतला. पाहतापाहता ज्वालाग्राही साहित्य मोठ्या प्रमाणावर आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. त्यानंतर हळूहळू आगीने रौद्ररूप धारण केले. आगीमुळे पसरलेल्या काळ्या धुरामुळे परिसरातील आसमंत काळवंडला होता. सिडको, ओएनजीसी, जेएनपीएचे सहा बंब घटनास्थळी दाखल झाले होते. अग्नीशमन दलाच्या जवानांनी दोन तासांच्या शर्थीच्या प्रयत्नांनंतर आग आटोक्यात आली होती.मात्र त्यानंतर धुरामुळे पुन्हा आग लागली.अग्नीशमन दलाच्या जवानांनी तत्परतेने पुन्हा आग आटोक्यात आणली.

या दोन तासांच्या आगीत कंपनीच्या गोदामातील सर्वच सामान जळून खाक झाले आहे. आग विझविण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना मोठ्या प्रमाणावर पाण्याची कमतरता भासली.त्यामुळे जवानांना आग विझविण्यासाठी चांगलेच शर्थीचे प्रयत्न करावे लागले.कंपनीच्या भिंती तोडून अग्निशमन दलाच्या जवानांना आग विझविण्यासाठी काम करावे लागले.तसेच कंपनीच्याही काही त्रुटीही निदर्शनास आल्या असल्याचे अग्निशमन दलाच्या जवानांनी सांगितले.तर या आगीत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही.मात्र श्वास गुदमरलेल्या एका कामगाराला उपचारासाठी जेएनपीएच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असल्याची माहिती न्हावा -शेवा पोलिसांकडून देण्यात आली. तसेच या आगीत कंपनीचे गोदामासह सर्वच सामान जळून नष्ट झाल्याची माहितीही पोलिसांनी दिली. आगीच्या नेमक्या कारणांचा शोध घेण्यात येणार आहे.तुर्तास आग विझली असली तरी गरम राख,धूर निघत आहे . त्यामुळे सर्वच शांत झाल्यानंतरच होणाऱ्या चौकशीतून नुकसानीचा नेमका आकडा समजून येईल असे पोलिसांकडून सांगण्यात आले.

 

Web Title: Massive fire breaks out at chocolate company's godown in JNPA SEZ; Millions of materials were burnt

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :fireआग