Maharashtra Election 2019 : सुरेश लाड यांचा अर्ज दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: October 4, 2019 02:41 AM2019-10-04T02:41:02+5:302019-10-04T02:42:24+5:30
१८९ कर्जत विधानसभा मतदारसंघामध्ये गुरु वारी राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार सुरेश लाड यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे, या वेळी महाआघाडीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कर्जत : १८९ कर्जत विधानसभा मतदारसंघामध्ये गुरु वारी राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार सुरेश लाड यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे, या वेळी महाआघाडीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आमदार सुरेश लाड हे या वर्षी निवडणूक लढविणार नव्हते, तसे त्यांनी जाहीर केले होते. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने जिल्हा परिषद सदस्य सुधाकर घारे यांचे नाव पुढे येत होते. मात्र, शिवसेना-भाजप-आरपीआय युतीचे उमेदवार म्हणून शिवसेनेचे माजी उपजिल्हाप्रमुख महेंद्र थोरवे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. अशा वेळी राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, शेतकरी कामगार पक्ष, स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष व समविचारी पक्ष महाआघाडीकडे तगडा उमेदवार असणे गरजेचे आहे म्हणून आघाडीतील सर्वच पक्षाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी आमदार सुरेश लाड यांची मनधरणी केली. कार्यकर्त्यांच्या विनंती, आग्रहाला मान देऊन निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला तसे बुधवारीच राष्ट्रवादी भवनमध्ये पत्रकार परिषद घेऊन त्यांनी जाहीर केले होते.
आमदार सुरेश लाड गुरु वारी आपला उमेदवारी अर्ज भरण्यासाठी राष्ट्रवादी भवन येथून प्रांत कार्यालयात निघाले, या वेळी आघाडीतील सर्वच पक्षाचे कार्यकर्ते रॅलीत सामील झाले होते. प्रांत कार्यालयात निवडणूक निर्णय अधिकारी वैशाली परदेशी-ठाकूर यांच्याकडे आमदार सुरेश लाड यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. या वेळी हनुमंत पिंगळे, काँग्रेसचे तालुका अध्यक्ष मुकेश सुर्वे, माजी तालुका अध्यक्ष अरविंद पाटील, शेकापचे तालुका चिटणीस प्रवीण पाटील, स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे जिल्हा अध्यक्ष उत्तम जाधव, तानाजी चव्हाण, एकनाथ धुळे आदी उपस्थित होते.
माणिक जगताप यांचा उमेदवारी अर्ज दाखल
दासगाव : १९४ महाड विधानसभा मतदारसंघातील काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार माणिक जगताप यांनी गुरुवारी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. या वेळी माणिक जगताप यांनीदेखील शिवसेनेने केलेल्या शक्तिप्रदर्शनाला जोरदार प्रत्युत्तर दिले. अर्ज दाखल केल्यानंतर महाड शहरातून मिरवणूक काढली.
उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस जवळ येऊ लागल्याने गुरुवारी सकाळी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे उमेदवार माणिक जगताप यांनी गुरु वारी आपला उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी विठ्ठल इनामदार यांच्याकडे सादर केला. या वेळी शेतकरी कामगार पक्षाचे जयंत पाटील, रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडियाचे तालुकाध्यक्ष मोहन खांबे, मुंबई महानगरपालिकेच्या गटनेत्या राखी जाधव, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष नीलेश महाडिक आदी मान्यवर उपस्थित होते. या वेळी महाड, माणगाव आणि पोलादपूर तालुक्यातील काँग्रेस, शेकाप आणि राष्ट्रवादी आघाडीचे कार्यकर्ते शहरात दाखल झाले होते. येथील सालवाड नाका येथून ढोल-ताशांचा गजर करत मिरवणूक निघाली.
अपक्ष चंद्रकांत धोंडगे यांचा उमेदवारी अर्ज दाखल
महाड : महाड विधानसभा मतदारसंघात कुणबी समाजाचे ज्येष्ठ कार्यकर्ते चंद्रकांत धोंडगे यांनी आपल्या समर्थकांसह उमेदवारी अर्ज दाखल केला. चंद्रकांत धोंडगे हे मूळचे महाड तालुक्यातील बेबलघर येथील असून ते माजी केंद्रीय मंत्री अनंत गीते यांचे समर्थक मानले जातात. या वेळी कुणबी समाजातील कार्यकर्ते उपस्थित होते. महाड प्रांताधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी विठ्ठल इनामदार यांच्याकडे अर्ज सादर केला.