Maharashtra Election 2019 : रायगडमधील सात विधानसभा मतदारसंघात ६२ अर्ज दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: October 4, 2019 02:48 AM2019-10-04T02:48:32+5:302019-10-04T02:49:28+5:30

रायगड जिल्ह्यातील सात विधानसभा मतदारसंघांमध्ये गुरुवारी शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, शेकाप आणि भाजपच्या दिग्गज उमेदवारांनी आपापले उमेदवारी अर्ज दाखल केले.

Maharashtra Election 2019: 62 nominations filed in seven Assembly constituencies in Raigad | Maharashtra Election 2019 : रायगडमधील सात विधानसभा मतदारसंघात ६२ अर्ज दाखल

Maharashtra Election 2019 : रायगडमधील सात विधानसभा मतदारसंघात ६२ अर्ज दाखल

Next

अलिबाग : रायगड जिल्ह्यातील सात विधानसभा मतदारसंघांमध्ये गुरुवारी शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, शेकाप आणि भाजपच्या दिग्गज उमेदवारांनी आपापले उमेदवारी अर्ज दाखल केले. उमेदवारी अर्ज दाखल करण्याआधी सर्वच पक्षांनी जोरदार शक्तिप्रदर्शन केले.
अलिबाग विधानसभा मतदारसंघातून महायुतीचे महेंद्र दळवी, काँग्रेसकडून राजेंद्र ठाकूर, पेणमधून महायुतीचे रवींद्र पाटील, कर्जत आघाडीकडून सुरेश लाड, श्रीवर्धनमधून महायुतीचे विनोद घोसाळकर, आघाडीकडून अदिती तटकरे, महाड आघाडीकडून माणिक जगताप, पनवेलमध्ये महायुतीचे प्रशांत ठाकूर, उरणमध्ये शेकापकडून विवेक पाटील यांनी उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे सादर केले.

अर्ज भरण्याची शेवटची तारीख ४ आॅक्टोबर आहे. त्यामुळे काही उमेदवार आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. प्रमुख पक्षातील दिग्गज उमेदवारांनी गुरु वारचा मुहूर्त साधून आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. उमेदवारी अर्ज दाखल करताना जोरदार शक्तिप्रदर्शन करण्याचा प्रयत्न केला. जिल्ह्यातील सातही विधानसभा मतदारसंघात ३ आॅक्टोबरपर्यंत ५२ उमेदवारांनी ६२ उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. त्यामुळे बहुतांश लढतीचे चित्र स्पष्ट होत असले, तरी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची दिवशीच खरे चित्र स्पष्ट होणार आहे.

कर्जतमध्ये तीन अर्ज दाखल
कर्जत : १८९ कर्जत विधानसभा मतदारसंघामध्ये २७ सप्टेंबर ते ३ आॅक्टोबरपर्यंत चार उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. गुरु वारी तीन उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. निवडणूक कार्यालयातून २७ सप्टेंबर ते ३ आॅक्टोबरपर्यंत ४४ अर्ज घेऊन जाण्यात आले आहेत. मात्र, प्रत्यक्षात गुरु वारपर्यंत चार उमेदवारांनी आपले अर्ज दाखल केले आहेत. १ आॅक्टोबर रोजी कम्युनिस्ट पार्टी आॅफ इंडियाच्या वतीने अ‍ॅड. गोपाळ गुंजा शेळके यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. गुरु वार, ३ आॅक्टोबर रोजी राष्ट्रवादी काँग्रेस, राष्ट्रीय काँग्रेस, शेतकरी कामगार पक्ष, स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष व समविचारी पक्षाच्या महाआघाडी तर्फे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे विद्यमान आमदार सुरेश नारायण लाड, बहुजन समाज पार्टी (बसपा) सुरेश चिंतामण गायकवाड आणि जनहित लोकशाही पार्टीच्या वतीने किशोर नारायण शितोळे यांनी गुरु वारी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी वैशाली परदेशी-ठाकूर यांनी दिली.

पनवेलमध्ये आठ उमेदवारी अर्ज
पनवेल : पनवेल विधानसभा मतदारसंघामध्ये गुरुवारी आठ नामनिर्देशन अर्ज सादर करण्यात आले. अद्यापपर्यंत ३५ नामनिर्देशित पत्रांचे वाटप झाले असून एकूण दहा उमेदवारी अर्ज पनवेल निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना प्राप्त झाले आहेत. दाखल केलेल्या अर्जामध्ये भाजपच्या वतीने प्रशांत ठाकूर, अरुण भगत, हरेश केणी, संजय चौधरी, कांतीलाल कडू यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. तर रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडिया (कांबळे) श्याम डिंगळे, इंडियन नॅशनल परिवर्तन पार्टीच्या वतीने राजीव सिन्हा आदीनी उमेदवारी अर्ज पनवेल येथील प्रांत कार्यालयातील निवडणूक निर्णय अधिकाºयांकडे भरले आहेत. शनिवारी अर्जाची छाननी होणार असून सोमवार, ७ आॅक्टोबर रोजी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख आहे. पनवेल विधानसभा निवडणुकीसाठी यापूर्वी दोन उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले असून, गुरुवारी आठ उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले असल्याने उमेदवारी अर्जाची संख्या दहावर गेली आहे.

Web Title: Maharashtra Election 2019: 62 nominations filed in seven Assembly constituencies in Raigad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.