काय म्हणावं यांना! बायको नांदायला येत नाही म्हणून बॉम्बस्फोट, फोननंतर पोलीस यंत्रणा हादरली
By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2024 11:32 AM2024-05-14T11:32:38+5:302024-05-14T11:36:09+5:30
संतापलेल्या नवऱ्याने थेट पुणे पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला फोन करत शहरात सात ठिकाणी बॉम्बस्फोट घडविण्याची धमकी दिली
पुणे: शहरात एकीकडे लोकसभेचे मतदान सुरू असताना, दुसरीकडे संतापलेल्या नवऱ्याने थेट पुणेपोलिसांच्या नियंत्रण कक्षाला फोन करत शहरात सात ठिकाणी बॉम्बस्फोट घडविण्याची धमकी दिली. यामुळे पोलिस प्रशासन कामाला लागले, मात्र बायको नांदायला येत नसल्याने रागाच्या भरात नवऱ्याने हा प्रताप केल्याचे पोलिस तपासात समोर आले. शहरात एकीकडे मतदान सुरू असताना नियंत्रण कक्षाला आलेल्या फोनमुळे पोलिसांना धक्का बसला.
पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन संबंधित व्यक्तीला ताब्यात घेऊन चौकशी केली. मात्र, सत्यता समोर आल्यानंतर पोलिसांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. पुणे शहरामध्ये गेल्या काही दिवसांपासून विविध गुन्ह्यांमध्ये वाढ होत आहे. शहरात वाहनांची तोडफोड करून हवेत कोयते नाचवून दहशत पसरविण्याच्या घटना घडत आहेत. मागील महिन्यात चारवेळा गोळीबाराच्या घटना घडल्या आहेत. गुन्हेगारांप्रमाणे कौटुंबिक वाद आणि कलहदेखील समोर येत आहेत. किरकोळ कारणावरून कुटुंबात वाद होतात. काही दिवसांपूर्वी एका कुटुंबामध्ये चिकनवरून वाद झाला. त्यानंतर आईने व मुलांनी मिळून बापाला बेदम चोप दिला होता.