उकाड्यावर शिडकावा! विदर्भ, मराठवाड्यात पुढील पाच दिवस वादळी पावसाची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2024 05:23 AM2024-04-18T05:23:12+5:302024-04-18T05:24:39+5:30

चढला पारा, बरसल्या अवकाळी धारा 

Vidarbha, Marathwada likely to receive thundery rain for the next five days | उकाड्यावर शिडकावा! विदर्भ, मराठवाड्यात पुढील पाच दिवस वादळी पावसाची शक्यता

उकाड्यावर शिडकावा! विदर्भ, मराठवाड्यात पुढील पाच दिवस वादळी पावसाची शक्यता

लोकमत न्यूज नेटवर्क, पुणे : अरबी समुद्रातील चक्रीवादळाच्या स्थितीमुळे गुजरातकडून कोकण तसेच मध्य महाराष्ट्रात आर्द्रतायुक्त उष्ण वारे येत आहेत. बंगालच्या उपसागरावरून छत्तीसगड तेलंगणामार्गे विदर्भातही आर्द्रतायुक्त उष्ण वारे येत असल्याने शुक्रवारी व शनिवारी राज्यात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तविली आहे. पुढील दोन दिवस मराठवाड्यात काही जिल्ह्यांत उष्णतेच्या लाटेचा इशारा असतानाच बुधवारी काही भागात पाऊस झाला. बीडमध्ये वीज कोसळून चार जनावरे दगावली. हिंगोलीतही पावसाने हजेरी लावली. 

कोकण व विदर्भात येत असलेल्या आर्द्रतायुक्त उष्ण वाऱ्यांमुळे दिवसा कमाल तापमानात वाढ झाली आहे. तर दुपारनंतर रात्री उशिरापर्यंत ढगाळ वातावरणामुळे आर्द्रता वाढली आहे. परिणामी, पुढील पाच ते सात दिवस हलक्या पावसाची शक्यता निर्माण झाली आहे. - डॉ. अनुपम कश्यपी, हवामानतज्ज्ञ

रात्री उशिरापर्यंत उकाडा
वातावरणातील खालच्या स्तरातील द्रोणिका रेषा सध्या दक्षिण विदर्भापासून दक्षिण कोकणापर्यंत गेली असल्याने कोकणात तसेच मुंबईत कमाल तापमानात वाढ झाल्याचे भारतीय हवामानशास्त्र विभागाकडून सांगण्यात आले. तसेच, आर्द्रतायुक्त उष्ण वाऱ्यांमुळे पावसाची शक्यता निर्माण झाली आहे. यामुळे रात्री उशिरापर्यंत आर्द्रता वाढल्याने उकाडा वाढला आहे. 

सांगली, कोल्हापूरमध्ये गारपीटीने झोडपले
कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ येथे बुधवारी सायंकाळी गारपीट झाली.  सातारा जिल्ह्यातही पावसाने हजेरी लावली. तर, सांगली जिल्ह्याला गारपिटीने झोडपले. 

कमाल तापमान  
४३ अंशांवर : मालेगाव, जेऊर (जि. सोलापूर), बीड 
४२ अंशांवर : जळगाव, सोलापूर, वाशिम, अकोला  
४१ अंशांवर : परभणी, नांदेड 
४० अंशांवर : चिखलठाणा (छत्रपती संभाजीनगर), जालना, सातारा, नाशिक, बारामती, धाराशिव

काय आहे अंदाज?
गुरुवारी छत्रपती संभाजीनगर, बीडमध्ये उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे तर नांदेड, लातूर, धाराशिव जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज आहे. शुक्रवारी व शनिवारी विदर्भात वादळी वारे तसेच विजांच्या कडकडाटात पावसाची शक्यता आहे. 

Web Title: Vidarbha, Marathwada likely to receive thundery rain for the next five days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.