शिवाजीनगर एस.टी स्थानक महामेट्रोवाद: प्रवाशांना अजून २ वर्षे वाकडेवाडीला जाावेच लागणार

By राजू इनामदार | Published: August 31, 2023 05:56 PM2023-08-31T17:56:42+5:302023-08-31T17:57:19+5:30

आणखी किमान दोन ते तीन वर्षे प्रवाशांना वाकडेवाडीला जावेच लागणार आहे....

Shivajinagar ST Station Mahametrowad: Passengers will have to go to Vakdewadi for another 2 years | शिवाजीनगर एस.टी स्थानक महामेट्रोवाद: प्रवाशांना अजून २ वर्षे वाकडेवाडीला जाावेच लागणार

शिवाजीनगर एस.टी स्थानक महामेट्रोवाद: प्रवाशांना अजून २ वर्षे वाकडेवाडीला जाावेच लागणार

googlenewsNext

पुणे : मागील तीन वर्षांपासून महामेट्रोच्या कामामुळे बंद असलेले शिवाजीनगर एस.टी. स्थानक नव्याने सुरू होण्याची चिन्हे आहेत. येत्या आठवड्यात महामेट्रो व एस.टी महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची या विषयावर संयुक्त बैठक होणार आहे. एस.टी. स्थानकावरचे व्यापारी संकुल कोणी व कसे बांधायचे यावर बैठकीत चर्चा करून निर्णय घेण्यात येणार आहे. तोपर्यंत म्हणजे आणखी किमान दोन ते तीन वर्षे प्रवाशांना वाकडेवाडीला जावेच लागणार आहे.

महामेट्रोने त्यांच्या एसटी स्थानकाच्या खालील बाजूस असणारे भुयारी मेट्रो स्थानक व मेट्रो मार्ग बांधण्यासाठी म्हणून शिवाजीनगर एसटी स्थानक पाडले. त्यावेळी महामंडळ व मेट्रो यांच्यात झालेल्या करारानुसार महामेट्रो भुयारी स्थानकाच्या वरील बाजूला एसटी स्थानक पूर्वी होते, तसे बांधून देणार होते. मात्र त्याच्यावरून वाद झाला. महामंडळाने स्थानकाच्या वर व्यापारी संकुल बांधून देण्याचीही मागणी केली. करारात तसे नसल्यामुळे ‘महामेट्रो’ने त्याला नकार दिला. त्यानंतर राज्यात राजकीय सत्ताकारण सुरू झाले व त्यात या विषयाचा काहीच निर्णय झाला नाही.

आता महामेट्रोचे भुयारी स्थानक वापरात येऊन महिना होऊन गेला, तरीही शिवाजीनगर एसटी स्थानकाचा काहीच निर्णय झालेला नाही. त्यामुळे शहरातील प्रवाशांना जुन्या एसटी स्थानकापासून बरेच दूरवर नेलेल्या वाकडेवाडी स्थानकात जावे लागते आहे. त्यासाठी रिक्षा व अन्य वाहनांचा खर्च करावा लागतो. त्याशिवाय रात्री उशीरा एसटीने आल्यास शहरात येण्यासाठी हाच त्रास सहन करावा लागतो.

आता या विषयावर एसटी महामंडळ व महामेट्रो अशी संयुक्त बैठक होणार आहे. त्याआधी महामेट्रोने स्थानक पूर्वी होते तसे बांधून देण्याचे मान्य केले आहे. स्थानकाच्या वर बांधायचे व्यापारी संकुल ‘बांधा, वापरा, हस्तांतर करा’ या तत्त्वावर बांधण्याबाबत संयुक्त बैठकीत चर्चा होईल. महामेट्रोलाही या व्यापारी संकुलात सहभागी करून घेण्यात असल्याचे समजते. एसटी महामंडळाला आर्थिक स्थितीमुळे स्वत: व्यापारी संकुलाचे बांधकाम करता येणे शक्य नाही. त्यामुळे या निर्णयाप्रत अधिकारी आले असल्याची माहिती मिळाली.

इमारतीचा आराखडा वगैरे तयार करण्याची जबाबदारी एसटी महामंडळाची आहे. त्यांनी अद्याप आराखडाच तयार केलेला नाही. वर व्यापारी संकुल बांधायचे असल्यास त्याप्रमाणे खालील एसटी स्थानकाच्या बांधकामाचे नियोजन करावे लागेल. व्यापारी संकुल बीओटी बांधायचे ठरल्यास त्यात महामेट्रोचा वाटा असणार आहे.

अतुल गाडगीळ- प्रकल्प संचालक, महामेट्रो

बैठकीत काय निर्णय होतो, यावर सगळे अवलंबून आहे. स्थानक पूर्वी होते, तसे बांधून देण्याची महामेट्रोची जबाबदारी होती. त्यांनी ती मान्य केली आहे. व्यापारी संकुल बांधणे महामंडळाला आवश्यक आहे, मात्र त्याआधी स्थानक सुरू होणे प्रवाशांसाठी गरजेचे आहे.

विद्या भिलारे- मुख्य अभियंता, एस.टी.महामंडळ

अधिवेशनात मी हा मुद्दा उपस्थित केला. त्यानंतर मुख्य सचिवांच्या उपस्थितीत एक संयुक्त बैठकही झाली. त्याच जागेवर त्वरित एसटी स्थानक सुरू व्हावे अशीच लोकप्रतिनिधी म्हणून माझी मागणी आहे. लवकरच होणाऱ्या बैठकीतही मी त्याबाबतीत आग्रही राहणार आहे. वाकडेवाडीला जाणे प्रवाशांसाठी फारच त्रासदायक आहे.

सिद्धार्थ शिरोळे- आमदार, शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघ

 

Web Title: Shivajinagar ST Station Mahametrowad: Passengers will have to go to Vakdewadi for another 2 years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.