कात्रज उद्यानालयाच्या अनाथालयातून बिबट्या पळाला; अधिकाऱ्यांकडून माहिती देण्यास टाळाटाळ
By ऑनलाइन लोकमत | Published: March 4, 2024 08:46 PM2024-03-04T20:46:12+5:302024-03-04T20:54:15+5:30
उद्यान पर्यटकांसाठी सुरुच, प्रशासनाकडून खबरदारी न घेतल्याबाबत प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत
संतोष गाजरे, लोकमत न्यूज नेटवर्क, कात्रज: कात्रज उद्यानांमधील अनाथालयात असणारा बिबट्या अनाथालयातून बाहेर पळाल्याची घटना कात्रज उद्यानामध्ये सोमवारी घडली आहे. ही घटना घडून देखील उद्यान प्रशासनाकडून सुरक्षेच्या दृष्टिकोनातून नागरिकांसाठी बाग बंद करण्यात आलेली नाही किंवा तशा सूचनादेखील देण्यात आलेल्या नाहीत. कात्रज उद्यानामध्ये भेट देणाऱ्या पर्यटकांची संख्या मोठ्या प्रमाणामध्ये असते. बिबट्या पिंजऱ्यातून बाहेर पडला असल्याने याचा प्राणी संग्रहालयामधील कर्मचाऱ्यांना तसेच पर्यटकांना धोका आहे. असे असतानादेखील प्राणी संग्रहालय प्रशासनाकडून कोणत्याही प्रकारची खबरदारी का घेण्यात आली नाही? असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.
प्राणी संग्रहालयाच्या अनाथालयात असणारा बिबट्या बाहेर पडतोच कसा, योग्य ती सुरक्षा व काळजी प्राणीसंग्रहालय प्रशासनाकडून घेण्यात आली नाही का, असादेखील प्रश्न उपस्थित केला जात आहे. या अगोदर प्राणी संग्रहालयामध्ये अशा विविध घटना घडल्या होत्या. त्यामुळे प्राणीसंग्रहालयातील सुरक्षा कोणाच्या भरवशावर आहे, असा सवाल नागरिकांमधून विचारला जात आहे. बिबट्या पिंजऱ्याच्या अनाथालयाच्या जवळपास उद्यानातच आहे व त्याला शोधण्याचे काम सुरू आहे, असे कात्रज प्राणी संग्रहालयाचे संचालक राजकुमार जाधव यांनी सांगितले. या संदर्भात अधिकची माहिती देण्यासाठी अनाथालय अधिकाऱ्यांकडून टाळाटाळ करण्यात आली.