PMC: पुण्यातील २६ रूफ टॉप हॉटेलला पाठविली नोटीस, पण कारवाई कधी?
By ऑनलाइन लोकमत | Published: November 28, 2023 01:01 PM2023-11-28T13:01:47+5:302023-11-28T13:02:24+5:30
या हॉटेलच्या मद्य परवान्यावर कारवाई कधी करणार, असा सवाल उपस्थित केला जात आहे....
पुणे : शहरातील बेकायदेशीर रूफ टॉप हॉटेलवर पालिकेने कारवाई केल्यानंतर काही दिवसात ही हॉटेल पुन्हा सुरू केली जात आहेत. त्यामुळे ही हॉटेल महापालिकेच्या रडारवर आली आहेत. त्यासंदर्भात पालिकेने जिल्हाधिकाऱ्यांशी पत्रव्यवहार केला आहे. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी समिती नेमली असून, २६ रूफ टॉप हॉटेलला नोटीस पाठविली आहे. पण, या हॉटेलच्या मद्य परवान्यावर कारवाई कधी करणार, असा सवाल उपस्थित केला जात आहे.
शहरातील इमारतींच्या गच्चीवरील बार आणि हॉटेलविरोधात (रूफ टॉप) महापालिका कारवाई करत आहे. मात्र, हॉटेल्सना जिल्हा प्रशासनाकडून परवाने दिले जात असल्याने महापालिकेतर्फे जिल्हाधिकाऱ्यांना पत्र पाठविले आहे. यामध्ये अनधिकृत बार आणि हॉटेलची नावे कळवण्यात येणार असून, त्यांचे मद्य परवाने रद्द करण्याची शिफारस केली आहे. तसेच यापुढे हॉटेल्स व बारना परवाने देण्यापूर्वी महापालिकेचे नाहरकत पत्र घ्यावे, अशी शिफारसही जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली होती.
रूफ टॉप हॉटेलसह, साइड व फ्रंट मार्जिनमध्ये उभ्या राहिलेल्या अनधिकृत बांधकामांवर कारवाई करा आणि पंधरा दिवसात त्याचा अहवाल सादर करा, असे आदेश आयुक्तांनी बांधकाम विभागाच्या सर्व कनिष्ठ अभियंत्यांना दिले होते. त्यानुसार बांधकाम विभागाने कार्यवाही सुरू केली आहे. त्यात शहरातील सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून रूफटॉप हॉटेल बंद करावी, अशी सूचना पोलिसांनी केली आहे. या सर्व पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी समिती नेमली आहे. त्याचबरोबर मद्य परवाने देण्यासाठी पालिकेच्या एका अधिकाऱ्यांचा समावेश केला आहे.