आईने घेतला मुलीचा जीव; अमेरिकेत जाण्यावरून सुरु होता वाद
By ऑनलाइन लोकमत | Published: September 9, 2019 09:01 PM2019-09-09T21:01:25+5:302019-09-09T22:22:09+5:30
अमेरिकेत जाण्यावर झालेल्या वादातून आईने मुलीचा खून केल्याची दुर्दैवी घटना पुण्यात घडली आहे. या बाबत दत्तवाडी पोलीस स्थानकात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
पुणे : अमेरिकेत जाण्यावर झालेल्या वादातून आईने मुलीचा खून केल्याची दुर्दैवी घटना पुण्यात घडली आहे. या बाबत दत्तवाडी पोलीस स्थानकात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
सदर घटना तावरे कॉलनी येथे घडली आहे.सोमवारी दुपारी पाऊणच्या दरम्यान झालेल्या या थरारनाट्यात चिमुरडीने जीव गमावला आहे. अक्षरा अमित पाटील (वय ६ वर्षे )असे तिचे नाव आहे. तर तिची आई श्वेता अमित पाटील (वय 36 वर्षे) हिच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत संतोष पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार माहिती अशी की, श्वेता या बी कॉम'पर्यंत शिकल्या असून त्यांचा आणि पती अमित यांचा मागील काही दिवसांपासून वाद सुरु होता. त्या मनोरुग्ण आहेत असे फिर्यादीत म्हटले आहे.
मात्र त्यांचा पतीसोबत अमेरिकेत जाण्यास विरोध होता तर पती अमित यांचा त्याकरिता प्रयत्न होता. अखेर हा वाद सोडवण्यासाठी ते त्यांच्या काकांकडे अरविंद अपार्टमेंट तावरे कॉलनी येथे गेले. तिथे सुरु झालेल्या वादाच्या भरात त्यांनी मुलगी अक्षरा हिला स्वयंपाकघरात नेऊन कडी लावली. त्यानंतर टोकदार चाकू तिच्या हातात भोकसून नसा कापल्या. घरातल्यांनी हाका मारूनही त्या दरवाजा उघडत नव्हत्या. अखेर पोलिसांचे नाव घेतल्यावर तिने दार उघडले तेव्हा तिच्या हातात रक्ताने माखलेला चाकू होता. यावेळी अक्षरा रक्ताच्या थारोळ्यात आढळून आली. तिला तात्काळ ससून रुग्णालयात भरती केले असता ती मयत झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. पुढील तपास पोलीस निरीक्षक गुन्हे राजेंद्र सहाणे करत आहेत.