महाराष्ट्र भोळा आहे, गद्दार नाही; आम्ही बोलतो ते करून दाखवतो, उद्धव ठाकरेंचे मोदींना प्रत्युत्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: May 1, 2024 12:26 PM2024-05-01T12:26:00+5:302024-05-01T12:26:36+5:30

भाजप ही घरे फोडणारी टोळी असून यांना कोणी लग्नालाही बोलावू नये, कारण तिथेही ते कुटुंब फोडतील

Maharashtra is naive, not traitorous; We do what we talk about, Uddhav Thackeray's reply to Modi | महाराष्ट्र भोळा आहे, गद्दार नाही; आम्ही बोलतो ते करून दाखवतो, उद्धव ठाकरेंचे मोदींना प्रत्युत्तर

महाराष्ट्र भोळा आहे, गद्दार नाही; आम्ही बोलतो ते करून दाखवतो, उद्धव ठाकरेंचे मोदींना प्रत्युत्तर

पुणे : सोमवारी मोदींची रेसकोर्सवर सभा झाली. ठिकाण योग्य होते. कारण त्यांना घोडेबाजाराचीच सवय आहे; मात्र तुमच्याकडे आले ते घोडे नाहीत तर गाढवे आहेत, अशी टीका शिवसेनेचे (उद्धव ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली. भटकता आत्मा असतो तसाच वखवखलेला आत्माही असतो आणि तो सगळीकडे फिरत असतो, असे प्रत्युत्तरही त्यांनी मोदी यांना दिले.

महाविकास आघाडीचे पुणे आणि बारामती लोकसभेतील उमेदवार रवींद्र धंगेकर व सुप्रिया सुळे यांच्या प्रचारार्थ वारजे येथे मंगळवारी रात्री ठाकरे यांची सभा झाली. ज्येष्ठ नेते शरद पवार, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, महाराष्ट्राचे प्रभारी रमेश चेन्नीथला, माजी मंत्री बाळासाहेब थोरात, मदन बाफना, शिवसेनेचे सचिन अहिर, माजी मंत्री अनिल देशमुख यावेळी उपस्थित होते.

ठाकरे म्हणाले, मोदी यांची कीव येते आहे. महाराष्ट्रात ते कधीही इतक्या वेळा आले नाहीत. या वखवखलेल्या आत्म्याने शेतकऱ्यांकडे पहावे. महाराष्ट्र भोळा आहे, गद्दार नाही. आम्ही बोलतो ते करून दाखवतो. पवार यांनी कर्जमाफी केली. आम्हीही कर्ज माफ केले. आता बँकेचा ७० हजार कोटी रुपयांचा घोटाळा कोणी केला, हे त्यांनी सांगावे. संपूर्ण भाषणात ठाकरे यांनी मोदी यांनाच लक्ष्य केले. ही घरे फोडणारी टोळी आहे. यांना कोणी लग्नालाही बोलावू नये, कारण तिथेही ते कुटुंब फोडतील, असेही ठाकरे म्हणाले.

शरद पवार यांनीही मोदी यांच्यावर टीका केली. ते वारंवार महाराष्ट्रात येत आहेत. चांगली गोष्ट आहे. देशातील ४ राज्यांची निवडणूक एका टप्प्यात व महाराष्ट्रातील निवडणुकीला मात्र ५ टप्पे, याचे कारण त्यांना इथे भीती आहे. तुम्हाला सत्ता काय लोकांना तुरुंगात टाकण्यासाठी दिली आहे का, असा सवालही पवार यांनी केली. हा सत्तेचा गैरवापर आहे. महागाई, बेरोजगारी कशावरच त्यांचे नियंत्रण राहिलेले नाही. हे चित्र बदलायचे असेल तर देशात सत्ताबदल करण्याची गरज आहे, असे पवार म्हणाले.

Web Title: Maharashtra is naive, not traitorous; We do what we talk about, Uddhav Thackeray's reply to Modi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.